करोनाच्या साथीमुळे बंद असलेली थिएटर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या 6 महिन्यांपासून थिएटर बंद असल्याने सिनेसृष्टीला अवकळा आली आहे. इतका काळ वाट बघणे शक्य नसल्याने कित्येक निर्मात्यांनी नफा कमी झाला तरी चालेल असा विचार करून आपापले सिनेमे अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णयही घेऊन टाकला. आता अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब आणि वरुण धवनचा कुली नं 1 हे देखील याच पद्धतीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जाणार आहेत. हे दोनी खूप बड्या बॅनरचे सिनेमे आहेत आणि थिएटरवर रिलीज झाले असते तर या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला धंदा केला असता, हे निश्चित आहे.
हे दोन्ही सिनेमे दिवाळीच्या सुमारास ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच बिग बॅनर सिनेमांची टक्कर होणार आहे. थिएटरवर एकाच वेळी दोन बिग बजेट सिनेमे रिलीज होतात, तेंव्हा त्यांच्यातील स्पर्धेचा फटका एकाला तरी बसतो. पण ओटीटी प्लॅतफॉर्मवर ही स्पर्धा अशी घातक होत नाही. लक्ष्मी बॉम्ब पूर्वीच्या तमिळमधील मुनी 2 : कंचनाचा हिंदी रिमेक आहे. त्यात अक्षयबरोबर कियारा आडवाणीही आहे. तर कुली नं 1मध्ये वरुण धवन आणि सारा अली खान आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत.