भटिंडा – करोनाच्या साथीनंतर लोकांच्या जीवनात खूप बदल झालेला आहे. अमेरिकेतील सैकरामेंटो शहरात राहणाऱ्या लखविंदरसिंग यांचे आयुष्य करोनाच्या साथीत बदलून गेले आहे. करोनाच्या काळातील परिस्थिती पाहून त्यांच्या मनात विचार आला की, आता आपण उरलेल्या आयुष्यात काही ना काही वेगळे करू आणि वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगू या.
मग त्यांनी निर्णय घेतला, नियोजन केले आणि कारने प्रवास करत ते अमेरिकेतून भारतात पोचले. ( Lakhwinder reached Jalandhar by car from America ) 34 दिवसांमध्ये ते 20 देशांचा प्रवास करत भारतात येऊन पोचले. या काळात त्यांनी एकूण वीस हजार किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या सांगण्यानुसार करोनाच्या साथीत अनेकांना स्वतःचा जीव गमावताना पाहिले तेव्हा मनात विचार आला की, यापुढे आपण आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे.
तेव्हापासूनच त्यांनी नियोजनाला सुरवात केली. सगळे नियोजन होण्यास, सगळीकडच्या परवानग्या, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांनी तीन वर्षे लागली. घरातून निघाल्यावर अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावून त्यांनी कार इंग्लंडला पाठवली. इंग्लंडहून बेल्जियमला रेल्वेने पोचले. तिथून कारने पॅरीस, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, हंगेरी आदी देशांचा प्रवास करत तुर्कस्तानला पोचले. तिथून इराण आणि पाकिस्तानमार्गे ते भारतात पंजाबला पोचले.
पाकिस्तानात त्यांनी 14 दिवस घालवले. त्याकाळात त्यांनी गुरुद्वारा साहिब, लाहोर, टोबा टेक सिंह, पाकपटण या शहरांना भेट दिली. पाकिस्तानातत्यांचा अनेक ठिकाणी कौतुक व सत्कार करण्यात आला. 11 दिवस ते विविध कुटुंबांसमवेत राहिले.
कुटुंबियांनी केली होती चेष्टा…
लखविंदसिंग हे मूळचे पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील लम्मे गावचे रहिवासी आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेतून कारने प्रवास करत भारतात येण्याची कल्पना जेव्हा मी कुटुंबियांना सांगितली तेव्हा सगळ्यांनी माझी चेष्टा केली. काहीतरी डोक्यात खूळ घेतले आहे, असे कुटुंबियांचे म्हणणे होते. पण जेव्हा मी तयारी करू लागलो तेव्हा त्यांना काळजी वाटू लागली. मग शेवटी त्यांनी मनाची तयारी केली. पहिल्यांदा कुटुंबियांनी अशा प्रकारे प्रवास करण्यास विरोध केला होता पण, माझ्या जिद्दीपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. आता सगळा प्रवास सुखरूप पूर्ण झाल्यानंतर कुटुंबियांनाही आनंद झाला.
आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासठी पहिल्यांदा ज्या देशांमधून प्रवास करायचा आहे त्या सगळ्या देशांचा व्हिसा मिळवावा लागतो. परंतु त्यांना खूपच कमी देशांचा व्हिसा मिळवावा लागला, कारण त्यांच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट आहे. त्याखेरीज कारनेट तयार करावे लागते. त्यासाठी वाहनाच्या दुप्पट किंमत ठेव म्हणून ठेवावी लागते. त्यातील ठराविक रक्कम कापून नंतर पैसे परत दिले जातात.
लखविंदरसिंग 1985 मध्ये अमेरिकेत गेले. कष्टाने स्वतःचे जग निर्माण केले. आता तिथे त्यांचा तिथे व्यवसायात चांगला जम बसलेला आहे. आता ते विमानाने परत अमेरिकेला जाणार आहेत आणि कार जहाजाने पाठवणार आहेत.