राज्य राखीव पोलीस दलाच्या कॅन्टीनमध्ये लाखोंचा अपहार

सहायक फौजदाराविरुद्ध गुन्हा : रामटेकडी येथील धक्‍कादायक प्रकार

पुणे – वानवडी भागातील रामटेकडी येथे असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) कॅन्टिनमध्ये 62 लाख 98 हजार 956 रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अपहार प्रकरणात “एसआरपीएफ’मधील सहायक फौजदार सामील असल्याचेही उघडकीस आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक फौजदार रणजीत जगन्नाथ जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक रमेश बबन बेठेकर यांनी यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक बेठेकर “एसआरपीएफ’च्या गट क्रमांक एक येथे कल्याणकारी योजना अधिकारी आहेत. सहाय्यक फौजदार जाधव याच्याकडे रास्त भावात पोलिसांना विक्री करणाऱ्या गृहोपयोगी वस्तू विक्री केंद्राची (पोलीस कॅन्टिन) जबाबदारी सोपविण्यात आली होती. तळेगाव दाभाडे येथील मुख्य कॅन्टिनमधून रामटेकडी भागात असलेल्या कॅन्टिनला लागणाऱ्या धान्य तसेच अन्य वस्तूंची खरेदी केली जाते.

जाधव याने तेथून उधारीवर माल खरेदी केला. मात्र, पैसे अदा केले नाही. याबाबत तक्रार आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी “एसआरपीएफ’कडून एक समिती नेमण्यात आली होती. समितीकडून चौकशी करण्यात आली. तेव्हा जाधवने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. जाधवने 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत हा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. जाधवने त्याच्यावर ठेवलेले आरोप चौकशी समितीपुढे मान्य केले असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक विश्‍वजीत जगताप करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.