चलनातून बाद लाखोंच्या नोटा माजी मुख्यमंत्र्याच्या घरातून जप्त

मणिपूरमध्ये सीबीआयचे 9 ठिकाणी छापे

शिलॉंग (मणिपूर) : नोटबंदीदरम्यान चलनातून बाद केलेल्या लाखो रुपयांच्या चलनी नोटा मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्याच घरात आढळून आल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण उघड होण्याची शक्‍यता व्यक्‍त होते आहे.

मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओ इबोबी सिंह आणि इतरांशी संबंधित नऊ ठिकाणी सीबीआयने छापे घातले. इबोबी आणि इतरांच्याविरोधात मणिपूरमधील विकास निधीतून 332 कोटी रुपयांचा गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर तीन शहरांमधील या ठिकाणी छापे घालण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

सिंह यांच्या निवासस्थानी झडती घेत असतांना सीबीआयने 11.47 लाख रुपये रोख व 26.49 लाख रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून ताब्यात घेतल्या. चलनातून बाद झालेल्या नोटा बाळगणे हा देखील एक गुन्हा असून त्यासाठी जप्त केलेल्या रकमेच्या पाचपट इतका दंड होऊ शकतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
इबोबी सिंह आणि आयपाळ, इम्फाल आणि गुडगाव येथील मणिपूर विकास सोसायटीचे सदस्य असलेल्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा शोध घेतला, सिंह यांच्या निवासस्थानी झडती दरम्यान काही ब्रांडेड वस्तू आणि ऑडी, मित्सिबुशी, होंडा आणि ह्युंदाईच्या आठ लक्‍झरी कार देखील सापडल्या आहेत.

मणिपूर डेव्हलपमेंट सोसायटी (एमडीएस) चे तत्कालीन अध्यक्ष असताना सिंह यांनी 30 जून 2009 ते 6 जुलै, 2017 या कालावधीत इतरांबरोबर कारस्थान करून 332 कोटी रुपयांच्या सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. विकासकामांसाठीच्या एकूण 518 कोटी रुपयांमधेल निधीमधूनच हा गैरव्यवहार झाल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्‌याने सांगितले.

मणिपूर सरकारच्या विनंतीवरून सीबीआयने हा गुन्हा दाखल केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने सोसायटीचे माजी प्रकल्प संचालक निंगथेंम सिंह यांच्याकडून दहा लाख रुपयांचे बाद चलन आणि इम्फाळमधील दोन घरांची कागदपत्रेही जप्त केली आहेत. अन्य तिघा अधिकाऱ्यांच्या घरातून मालमत्ता आणि बॅंकेची कागदपत्रेही सीबीआयला सापडली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)