झाडणकामांच्या बिलांमध्ये लाखोंचा गफला

बिले मिळवून देण्यासाठी आमदार पीएची दमबाजी
 
पुणे  – महापालिकेकडून शहरातील झाडण कामासाठी नेमलेल्या ठेकेदारांकडून कामगारांना दरमहिन्याला अगाऊ रक्‍कम (उचल) दिल्याचे दाखवून लाखो रुपये लाटण्याचा घाट घालण्यात आला आहे. ही बाब समोर येताच; ही बिले थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर शहर भाजपच्या एका उच्च पदस्थ आमदाराच्या पीए (स्विय सहायक)कडून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.

धक्‍कादायक बाब म्हणजे “ही बिले मंजूर करा नाहीतर लक्षवेधीला सामोरे जा’ असा सज्जड दमच या पीएकडून महापालिकेत येऊन शुक्रवारी अधिकाऱ्यांना भरण्याचा प्रकार घडला. महापालिकेकडून शहर स्वच्छतेसाठी खासगी ठेकेदरांच्या माध्यमातून झाडणकाम केले जाते. त्यासाठी झाडणकाम करणारे मजूर हे ठेकेदार पुरवितात, क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीनुसार, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास 3 ते 5 कोटींचा निधी आला आहे. या निधीतून संपूर्ण वर्षभर ही कामे करून घेतली जातात. हे काम देण्यात आलेल्या ठेकेदाराने संबंधित मजूरांना दरमहिन्याला किमान वेतन कायद्यानुसार, महिन्याला सरासरी 12 हजार रुपये थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच ही कामाची बिले ठेकेदारांना दिली जातात.

मात्र, वारजे-कर्वेनगर आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे काम घेतलेल्या काही ठेकेदारांनी आपल्याकडे असलेल्या कामगारांना दर महिन्याला प्रत्येकी 2 हजार रुपयांची उचल दिली असल्याची कागदपत्रे सादर केली आहेत. त्यातच अशा प्रकारे उचल दिल्यास त्याबाबत संबंधित ठेकेदाराने खरच उचल दिली आहे किंवा नाही याची खातरजमा करून क्षेत्रीय कार्यालयाने तसे पत्र देणे आवश्‍यक आहे. मात्र, क्षेत्रीय कार्यालयाचे कोणतेही पत्र न घेता, थेट दरमहिन्याला उचल दिल्याची 2 हजारांची बिले सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिकेकडून ही बिले थांबविण्यात आली. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे पत्र आणण्यास ठेकेदारास सांगण्यात आले आहे.

मात्र, क्षेत्रीय कार्यालय पत्र देण्यास नकार देत असल्याने ही बिले द्यावीत, अशी मागणी करत संबंधित ठेकेदाराने पुण्यातील एका आमदारांच्या नावाचा वशीला लावला आहे. त्यासाठी आमदारांचा पीए म्हणून आलेल्या काही जणांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी महापालिकेची अंदाजपत्रकाची खास सभा सुरू असताना बाहेर बोलावून दम भरला, तुम्ही ही बिले मंजूर करा नाहीत तुम्हाला अडचणी येतील, आम्हाला एलएक्‍यू (तारांकीत प्रश्‍न) विचारावे लागतील असे सुनावले. हा गोंधळ महापालिकेच्या विस्तारीत इमारतीमधील सभागृहाच्या पत्रकार दालनाच्या बाहेर सुरू होता. त्यामुळे यावेळी काही पत्रकार तिथेच बाजूला होते. मात्र, याची कल्पना नसल्याने या आमदार पीएची बिले मंजूर करा म्हणून दमबाजी सुरू होती.

…असा लाटला जातो निधी

महापालिकेने झाडणकाम अथवा ठेकेदारांकडून बिगारी म्हणून घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन थेट बॅंकेत देणे बंधनकारक केले आहे. तसेच जर रोख रक्‍कम दिली तर बिले देण्यापूर्वी खरचं कामगारांना रक्‍कम दिली का नाही याची खातरजमा तसेच पुरावे घेऊन खात्याचे पत्र घेतल्यानंतरच बिले दिली जातात. मात्र, काही ठेकेदार प्रत्येक महिन्याला या कर्मचाऱ्यांना 2 हजार रुपयांची उचल दिल्याचे दाखवितात, समजा ठेकेदाराने अशी उचल दिलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या महिन्याला 250 दाखविली तरी, त्यांना महिन्याला 5 लाख रुपये उचल दिल्याचे दाखविले जाते. म्हणजे महिन्याला 5 ते 10 लाख रुपये कामगारांच्या नावाखाली खिशात भरले जात असल्याचे वास्तव आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक नियम केले असले तरी, काही अधिकाऱ्यांना पाठीशी धरून ही बिले लाटली जात आहेत. त्याचवेळी ही बाब चुकीची असल्याने बिले थांबविली गेल्यास राजकीय दबाव आणून कामगारांचे कष्टाचे पैसे लाटले जात असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.