लखनवीचं पुनरागमन

जुने ते सोने म्हणतात. जुनी फॅशन पुन्हा फिरून फिरून येते. त्यामुळे आपल्याकडे काही आईचे किंवा मोठ्या बहिणीचे महागडे ड्रेस असतील तर ते गाठोड्यात न टाकता जपून ठेवावे. कारण फिरून येणाऱ्या फॅशनमध्ये त्याचा पुन्हा समावेश होतो.

आता लखनवी चिकनच्या कुर्त्याचीच गोष्ट घ्या. पूर्वीपासून लखनवीमध्ये विविध ड्रेस किंवा साड्यांची रेलचेल असायची. यामुळे एकप्रकारे रिच लूक देऊन जायचा. लखनवी चिकन हे पांढऱ्या शुभ्र किंवा प्लेन विविधरंगी साडीवर हाताने टाके मारुन डिझाईन केलेले कापड. यात कॉटन कपड्यासोबतच कलाकुसरीला देखील तेवढेच महत्त्व असते. म्हणूनच असे कापड महाग असते. लखनवी चिकन केलेले ड्रेस विशेषत: उन्हाळ्यात अथवा समारंभात घालण्याची प्रथा आहे. यातून व्यक्तिमत्त्व उजळून दिसते. शिवाय सगळ्यांमध्ये तुमचा एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण थाटच दिसून येईल. लखनवी चिकनच्या पांढऱ्या शुभ्र पंजाबी ड्रेसवर किंवा फेंट अशा पिंक ड्रेसवर गळ्यात मोत्याची माळ आणि नाजुकसे मोत्याचे कानातले हा टिपिकल पार्टीवेअर ड्रेस सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ठरेल.

विशेषत: कुर्तो, पायजमा, यावर विशिष्ट प्रकारच्या धाग्यांचा वापर करून केलेली डिझाईन मोठ्या प्रमाणावर विकली जाते. अलीकडे कॉम्प्युटराईज्ड डिझाईन प्रोग्रॅमकडे कुर्त्यावर डिझाईन सहज करता येते. परंतु कोणताही संदर्भ नसताना पारंपरिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे डिझाईन्सची झालेली देवाणघेवाण हीच खरी लखनवी चिकनची वैशिष्ट्ये म्हणावी लागेल. लखनवी चिकनचा डार्क रंगाचा कुर्तासुद्धा तुम्ही जिन्सवर ट्राय करू शकता. अचानक कोणत्यातरी ऑफिशियल समारंभाला जायचे असेल तरीही हा पोशाख उत्तम दिसू शकेल.

लखनवी चिकन डिझाईन ही पांढऱ्या धाग्यांबरोबरच अन्य धागे वापरून केली जाते. कुर्ता शिवण्यापूर्वी गळा, बाही यावर उत्तम पद्धतीचे विविधरंगी धागे एकमेकांवर स्टीच करून वेगवेगळ्या डिझाईन करण्याची प्रथा आहे. थोडं जाडसर व एकाच रंगात असलेले कॉटन कापड यासाठी उपयोगातआणले जाते. लखनवी प्रथा आहे. लखनवी चिकनची कलाकुसर केलेली साडी ही कोणत्याही समारंभासाठी उत्तम लूक देऊन जाते. या साडीवर ब्लाऊज जरा हटके फॅशनने सजवले आणि त्यावर त्याच रंगाची इयररिंग्ज, बांगड्या, नेकलेस अशी ज्युलरी परिधान केली तर तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला चार चॉंदच लागतील. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारी साडी म्हणून या साडी पाहिले जाते.

– जान्हवी शिरोडकर

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×