लखीमपूर हिंसाचार : अजय मिश्रांना अभय की डच्चू? शहांच्या भेटीनंतर तर्क-वितर्क

नवी दिल्ली – लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर मिश्रा यांना अभय मिळणार की केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू याविषयीची उत्सुकता बळावली आहे.

उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीत रविवारी एका वाहनाने चार शेतकऱ्यांना चिरडले. ते वाहन मिश्रा यांच्या मुलाचे असल्याचे स्पष्ट झाले. त्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

विरोधी पक्षांनी मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली आहे. मात्र, शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या वाहनात आपला मुलगा नव्हता, असा दावा मिश्रा करत आहेत. ते प्रकरण तापले असतानाच मिश्रा यांनी शहा यांची भेट घेतली.

त्या भेटीत मिश्रा यांनी लखीमपूर खेरीतील घटनेची माहिती दिल्याचे समजते. त्या भेटीआधी मिश्रा त्यांच्या येथील कार्यालयात दाखल झाले. तिथे त्यांनी अर्धा तास शासकीय स्वरूपाचे कामकाज केले.

शहा यांची भेट घेणाऱ्या मिश्रा यांच्याबाबत कुठला निर्णय होणार का, याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.