अमोल बनकर
सासवड -विजयादशमी साडेतीन मुहूर्तापकी एक असल्याने या शुभ मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची लगबग सोमवार (दि. 26) थंडावली होती. तर मंगळवार (दि. 27) पासून ग्राहकांकडून दागिने विक्रेत्यांकडे सोन्या-चांदीच्या वस्तू व दागिन्यांची पूर्वनोंदणीस प्रारंभ झाला असून दिवाळीसाठी अधिक आकर्षक दागिने ग्राहकास कसे देता येतील यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
करोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीत अनेक सण सराफा व्यापाऱ्यांच्या हातून गेले. यंदा मार्चनंतर गुढीपाडवा, रक्षाबंधन, नागपंचमी, अक्षय्यतृतीया तसेच लग्न सोहळेही झाले नाहीत. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.
मात्र, आता बाजारपेठा खुल्या झाल्या असून घटता मृत्यू दर व कमी होणारी रुग्णसंख्या त्यातचबरोबर करोनाची भीतीही कमी झाली आहे. त्यामुळे टाळेबंदीत हातातून गेलेल्या सणांमधील सोने खरेदीची थोडी कसर ग्राहकांनी दसऱ्याला भरून काढली आहे.
तर आगाऊ नोंदणी सुरू झाली असल्याने ग्राहक उर्वरीत कसर दिवाळीत भरून काढेल असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तरी ग्राहकांनी आपल्या आवडीनुसार दागिन्यांची नोंदणी केल्यास त्यात अधिक कलाकुसरीचे विविध प्रकार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
दिवाळी पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी आपली दालने सज्ज केली असून दागिन्यांच्या नव्या श्रेणी, डिझाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पारंपरिक दागिन्यात पाटल्या, मंगळसूत्र, कंठीहार, हिऱ्याच्या अंगठ्या, चांदीच्या पूजेच्या वस्तू अथवा आदी खरेदीवर ग्राहकांचा जोर आहे. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते यंदा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक सोने-चांदीची खरेदी होईल. अनेक जण सोन्यात गुंतवणूक करणारे असल्याने हा सराफ व्यापाऱ्यांसाठी शुभसंकेत ठरणार आहे.
वाढत्या दरामुळे खरेदीला प्राधान्य :
सध्या 24 कॅरेट सोने 51 हजारावर गेले असून 22 कॅरेट 49 हजारावर गेले आहे. सोन्याचे भाव यापुढेही वाढणारच असल्याने सोने खरेदीला पसंती दिली जात आहे. चांदी 43 हजार 500 रुपये प्रति किलो असल्याने चांदीच्या वस्तू, माळांची खरेदी जोरात होत आहे. वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यापेक्षा ग्राहकांचा अधिक कल हा सोने-चांदीकडे अधिक दिसत आहे.
दिवाळीसाठी खास आकर्षक असे दागिने उपलब्ध केले आहेत. तर लग्नाचा हंगामही सुरू होणार असल्याने त्यासाठी खास वधू-वरांसाठी वेगळे दालन उपलब्ध केले आहे. सध्या कमी वजनाच्या दागिन्यांना अधिक मागणी असल्याने पायापासून डोक्याच्या बिंदीपर्यंत आकर्षक दागिने दुकानात उपलब्ध आहेत. सर्वाधिक मागणी ही चेन, मंगळसूत्र, ब्रेसलेट, बांगड्या, अंगठ्यांना आहे. टेम्पेल दागिन्यांमध्ये विविध प्रकारही उपलब्ध आहेत. मजुरीचे दर वाजवी असल्याने ग्राहकांचे समाधान होत आहे.
– सन्नी सोळंकी, सोळंकी ब्रदर्स सासवड
लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे तसे मार्केट शांतच आहे. मात्र, दिवाळीत ग्राहक बाजारपेठेत येतील त्यांच्या मागणीनुसार आकर्षक टेम्पलचे दागिने व रोजच्या वापरातील दागिने उपलब्ध आहेत. दिवाळीसाठी खास गिफ्ट ठेवण्यात आले आहे.
-दिनेश उर्फ मुन्ना सोळंळी, ताराचंद ज्वेलर्स
दिवाळीसाठी नवीन व्हरायटीज दुकानात उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांना आर्कषक भेटवस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. सध्या टेम्पल दागिन्यांना अधिक मागणी असल्याने विविध आकाराचे, वजनाचे आकर्षक डिझाइनचे दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
– महावीर सोळंकी, राजेंद्र ज्वेलर्स सासवड