लाहौल टाकणार धर्मशाळाला मागे!

जगातील सर्वात उंच ठिकाणी उभारणार क्रिकेट स्टेडियम

मनाली -देशात हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळापेक्षाही उंच ठिकाणावर नवीन क्रिकेट स्टेडियम तयार करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशमधीलच लाहौल व्हॅलीमधील सिसू येथे जगातील सर्वात उंच ठिकाणावर असलेले क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे.

अटल बोगदा या जगातील सर्वात मोठ्या बोगद्याच्या शेजारी हे स्टेडियम होणार आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 10 हजार फूट उंच आहे. या स्टेडियमचे नाव लाहौल क्रिकेट स्टेडियम असे असणार आहे. या स्टेडियमसाठी वन विभागाने 38 एकर जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच जमीन खरेदी आणि अन्य कारवाई अंतिम टप्प्यात आहे. यासाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

लाहौल-स्पिटी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर म्हणाले, या स्टेडियममध्ये 10 हजार आसनसंख्या असणार आहे. लाहौल-स्पिती क्रिकेट असोसिएशन या स्टेडियमसाठी 2013 पासून काम करत आहे. आता लवकरच त्यांना हे स्टेडियम बांधण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. स्थानिक प्रशासन, पंचायत आणि रहिवासी क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी उत्सुक आहे. मे ते ऑक्‍टोबर या कालावधीत या स्टेडियममध्ये क्रिकेटचे सामने होऊ शकतील. मात्र, पहिल्या बर्फवृष्टीनंतर हिवाळ्यात हे स्टेडियम बंद ठेवावे लागेल, असेही ठाकूर यांनी नमूद केले.

दरम्यान, भारतातील किंवा जगातील सर्वात सुंदर क्रिकेट मैदान म्हणून धर्मशाळाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नाव घेतले जाते. हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे.

धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे हे जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. समुद्र सपाटीपासून 4 हजार 780 फूट उंचीवर असलेले हे स्टेडियम 2003 मध्ये बांधण्यात आले होते. या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय, तसेच आयपीएलचे सामने झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.