हिमांशू
बडे पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी दसरा! मागील काही दिवस पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारीची रसभरीत वर्णनं ऐकण्यात उडून गेले. आता दोन दिवस पाहुण्यांच्या सरबराईत कधी उगवले आणि कधी मावळले हेही समजणार नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा म्हणजे सर्वांनाच पर्वणी. खुद्द डोनाल्ड ट्रम्प इतके एक्साइट झालेत, की त्यांनी स्वतःच्या स्वागताला किती भारतीय उपस्थित राहतील, याचा आकडाही जाहीर करून टाकला. आता तेवढे लोक जमलेच पाहिजेत; अन्यथा लाडक्या पाहुण्याचा अपमान केल्यासारखं होईल.
दौऱ्याला चार दिवस उरलेले असताना ट्रम्प साहेबांनी पत्रकारांना सांगितलं की, विमानतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत सुमारे 70 लाख भारतीय स्वागताला हजर असतील. दोनच दिवसांनी त्यांनी हा आकडा बदलला आणि आपल्या स्वागतासाठी एक कोटी भारतीय उपस्थित राहणार असल्याचं जाहीर करून टाकलं. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्यांना तसं सांगितलंय म्हणे! ट्रम्प साहेबांचा कार्यक्रम आहे अहमदाबादेत. विमानतळापासून त्यांच्या कार्यक्रमस्थळापर्यंत म्हणजे मोटेरा स्टेडियमपर्यंतचं अंतर आहे 22 किलोमीटर. या लांबलचक रस्त्यावर आयोजित केलेला रोड शो हेच ट्रम्प साहेबांच्या दौऱ्याचं मुख्य आकर्षण ठरलंय. अहमदाबादची लोकसंख्या आहे सत्तर लाख. महापालिकेचे अधिकारी सांगतात की, 22 किलोमीटरच्या रोड शो दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा एक ते दोन लाख लोक उपस्थित राहू शकतात. वेगवेगळी आकडेवारी कळत असताना प्रत्यक्षात गर्दी मोजणार कोण, या प्रश्नाचं उत्तर अवघडच!
ट्रम्प साहेबांचा दौरा पूर्वीपासूनच अनेक कारणांनी गाजला. अर्थात, गाजायलाच हवा. पाहुणा साधासुधा नाहीये. चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा ठरली एक भिंत. ट्रम्प साहेबांच्या रोड शोच्या वाटेत एक भलीमोठी झोपडपट्टी लागते आणि ती त्यांना दिसू नये म्हणून रस्त्यालगत एक प्रचंड भिंत उभारण्यात आलीये म्हणे! स्वाभाविकच आहे. राजपुत्र सिद्धार्थाला दुःख दिसू नये, याची खबरदारी घेतली गेली नव्हती का? परंपराच ती आपली! ट्रम्प साहेब तर जगातल्या सर्वांत श्रीमंत देशाचे सर्वोच्च नेते. त्यांना दिसायला हवी केवळ गर्दी… एक कोटी भारतीयांची! त्यातसुद्धा एकही दरिद्रीनारायण दिसता कामा नये. ट्रम्प साहेबांना अशी चकचकीत गर्दी दिसेल, याची काळजी घ्यायला हवी. मुख्य म्हणजे, गर्दीचा मुद्दा गाजायला हवा. मनोरंजन व्हायला हवं. म्हणूनच बहुतेक गर्दीच्या विषयात मनोरंजन क्षेत्रानेही उडी घेतली असावी. प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी गर्दी जमवण्याचे काही खास उपाय सांगितले. सेलिब्रिटींना बघायला गर्दी होते, हे त्यांना नेमकं ठाऊक आहे. त्यामुळे मग त्यांनी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमीर खान, शाहरूख खान, कॅटरिना कैफ, दीपिका पदुकोण अशी काही शेलकी नावं ट्विट केली आणि सांगितलं, या मंडळींना ट्रम्प साहेबांजवळ उभं करा, म्हणजे निश्चित गर्दी जमेल!
काही चांगलं चाललेलं असलं की खोड्या काढायची लोकांना भारी हौस. इतक्या सेलिब्रिटींची नावं घेऊनसुद्धा रामगोपालांचं समाधान झालं नाही. जोडीला सनी लिओनीचं नावही त्यांनी मुद्दाम कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिलं. मीडियाचं लक्ष कसं वेधून घ्यायचं, याचे या मंडळींनी खरं तर ट्रेनिंग कॅम्प घेतले पाहिजेत. मीडियाला तर हा दौरा म्हणजे जणू पर्वणीच! या “शाही ट्रिप’ची रसभरीत वर्णनं आपल्यापर्यंत पोहोचतील आणि “काय ठरलं’ हे गुलदस्त्यात राहील, अशी आशा करू या!