Ladki Bahin Yojana – शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शहरातील महिलांची अक्षरशः धावपळ सुरू आहे. अर्जातील त्रुटी दुरुस्ती आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत असल्याने, अनेक महिला सेतू केंद्रे आणि ऑनलाइन माध्यमांकडे धाव घेताना दिसत आहेत. ही संधी हुकली तर आर्थिक लाभावर पाणी फिरणार असल्याने चिंता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले असले, तरी तांत्रिक चुका, अपूर्ण माहिती आणि ई-केवायसी न झाल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. प्रशासनाने दिलेल्या अंतिम मुदतीमुळे आता ‘शेवटच्या क्षणी’ दुरुस्ती करण्यासाठी महिलांची गर्दी वाढली आहे. काही ठिकाणी सेतू केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एप्रिल महिन्यात तीन महिन्यांचा एकत्रित आर्थिक लाभ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या महिलांची माहिती योग्यरित्या पडताळली जाईल, त्यांनाच पुढील लाभासाठी पात्र मानले जाणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अनेकांसाठी ‘शेवटचा निर्णयाचा क्षण’ ठरत आहे. अनेक महिलांचे अर्ज बाद दरम्यान, तपासणीदरम्यान अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. उत्पन्न मर्यादा, कुटुंबाची आर्थिक स्थिती, इतर योजनांचा लाभ आणि वैयक्तिक तपशील यांची छाननी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक अर्ज तपासणीतून बाद झाल्याने पात्र महिलांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. ई-केवायसी आणखी मुदतवाढीची शक्यता कमी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही अंतिम मुदत वाढवली जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे महिलांनी कोणतीही दिरंगाई न करता आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन ॲप, अधिकृत संकेतस्थळ किंवा जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. अर्जातील अनेक गोष्टी समजल्या नाहीत शहरातील काही महिलांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अर्ज करताना अनेक गोष्टी समजल्या नव्हत्या. आता शेवटच्या दिवशी कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे.” अर्जातील दुरूस्तीसाठी एकमेव मार्ग एकूणच, पिंपरी-चिंचवड ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला असून, तांत्रिक अडचणी आणि अंतिम मुदतीचा ताण यामुळे महिलांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. योग्य माहिती आणि वेळेवर केलेली दुरुस्तीच आता लाभ मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.