पुणे – “लाडकी बहीण योजना फसवी असल्याची टीका करत महाविकास आघाडीचे नेते या योजनेच्या विरोधात आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयात देखील दाद मागितली. पण, आम्ही ही योजना बंद होऊ दिली नाही आणि भविष्यात देखील योजना बंद करणार नाही,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पर्वती मतदारसंघात बिबवेवाडी येथे आयोजित जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री तथा आमदार पंकजा मुंडे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी मंत्री विजय शिवतारे, अमित गोरखे, दीपक मानकर, नाना भानगिरे, संजय सोनवणे, जगदीश मुळीक, विष्णू कसबे, सरस्वती शेंडगे, संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे, प्रवीण चोरबोले, आबा शिळीमकर, संतोष नागरे, हर्षदा फरांदे, सुनील कुरूमकर, श्रीकांत पुजारी, महेश वाबळे, बाबा मिसाळ, डॉ. सुनिता मोरे, प्रशांत दिवेकर,अनिरुद्ध भोसले उपस्थित हाेते.
फडणवीस म्हणाले, पुणे बदलत असून मेट्रो आधीच सुरू झाली पाहिजे होती. आघाडी सरकार हे केवळ घोषणा सरकार होते; पण आमचे सरकार गतिमान आहे. देशात सर्वांत वेगाने तयार झालेली पुणे मेट्रो आहे. स्वारगेट येथे मल्टीमॉडेल हब तयार करण्यात येत आहे. स्वारगेट ते कात्रज आणि खडकवासला ते खराडी मेट्रो प्रकल्पास तातडीने मंजुरी देण्यात आली. पुण्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम करण्यात येत आहे.