Ladki Bahin Yojana । Sudhir Mungantiwar – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. पण जेव्हा सातवा वेतन आयोग लागू केला तेव्हा 44 हजार कोटीचा बोजा पडला. तेव्हा काँग्रेसचा एकही नेता महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, असे म्हणाला नाही.
मात्र, दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजना लागू करण्यासाठी 46 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तेव्हा काँग्रेस नेते म्हणतात महाराष्ट्र कर्जबाजारी होईल.
आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्याचा जीडीपीसोबत कर्ज प्रमाण किती आहे, ते पाहिल पाहिजे, असे भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आपली सत्ता यावी, असे काँग्रेसचे स्वप्न होते. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेसच्या सत्तेत येण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे.
काँग्रेसवाले मुख्यमंत्री लाडकी बहीण विरोधात अपप्रचार करत आहेत. कधी म्हणतात आम्ही कोर्टात जाऊ, कधी म्हणतात महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, कधी फॉर्ममध्ये चुका शोधतात, कधी आम्ही योजना बंद करु असे सांगून घाबरवतात.
ज्यांना या योजनेचे पैसे नको आहे त्यांनी पैसे घेऊ नये. सरकार मोफत शिक्षण देत आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देत आहे. त्यामुळे काँग्रेसने तत्वज्ञान सांगू नये. या योजनेमुळे काँग्रेसची झोप उडाली आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.