रांधा, वाढा संकल्पनेतून स्त्रियांनी बाहेर पडावे

पद्मश्री डॉ. राणी बंग यांचे आवाहन : कुरण येथील जयहिंद संकुलात “तारूण्यभान’वर संवाद
नारायणगाव (वार्ताहर) – विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या विकासासाठी, स्त्री सक्षमीकरण चळवळ बळकट करणे, चूल आणि मूल, रांधा, वाढा आणि उष्टे काढा या संकुचित मानसिकतेतून स्त्रिया, मुलींनी बाहेर पडण्याची ही वेळ आहे, असे मत पद्मश्री, महाराष्ट्रभूषण, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी मांडले.

रोटरी क्‍लब ऑफ जुन्नर व जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व पॉलिटेक्‍निक यांच्या वतीने आयोजित तारूण्यभान या तीन शिबिरामध्ये त्या बोलत होत्या. हे मार्गदर्शन शिबिर कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलामध्ये पार पडले.
डॉ. बंग म्हणाल्या की, तारुण्य हा ऐन उमेदीचा काळ असतो; परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आजचा तरुण भरकटत चालला आहे. तारुण्य ही एक जबाबदारी आहे. यामध्ये जबाबदार वर्तन करून समाजापुढे आदर्श ठेवता येईल; परंतु आजचा तरुण हा व्यसनाधिनतेकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे दारूबंदी अंमलात आणणे ही काळाची गरज आहे. लैंगिक शिक्षणाचा अभाव राहिल्याने कुमारी मातांचे प्रमाण वाढले आहे. यावेळी तरूण पिढीला तारुण्यभानवर विद्यार्थी- विद्यार्थिनींशी संवाद साधला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ म्हणाले की, हे शिबिर तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या तरुणांच्या जिज्ञासेला योग्य वळण देणारे आहे.

तरुणांचा खऱ्या अर्थाने व्यक्‍तिमत्त्वाचा शोध घेऊन अंतर्मुख करायला लावणारे, नवी दिशा देणारे आहे. कर्तव्यदक्ष आणि संस्कारक्षम नागरिक शिबिरातून तयार होतील. कार्यक्रमापूर्वी डॉ. राणीताई बंग यांच्या हस्ते जयहिंद शैक्षणिक संकुलात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य वाय. एस. गुंजाळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शैक्षणिक शाखेच्या प्रमुख डॉ. व्ही. एम. धेडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. आर. ए. गाडेकर यांनी केले. शिबिराला जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जयहिंद तंत्रनिकेतनमधील 450 विद्यार्थी उपस्थित होते.c

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.