पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते; महिला सुरक्षा कार्यशाळेद्वारे दिली कायद्यांची माहिती
सातारा – आपल्या समाजातील महिलांना आजही स्वत: विषयी असलेल्या कायद्यांची माहिती नाही. आपल्यावर अन्याय झाला तरीही त्या अन्यायाला सामाजिक दडपणापोटी कुठेही दाद मागत नाहीत, ही मानसिकता बदलण्यासाठी प्रसारमाध्यमांनी महिलांविषयी असणाऱ्या कायद्यांची जनजागृती करुन त्यांच्या मानसिकतेत बदल करण्याची महत्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मंगळवारी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने “महिला सुरक्षा’ विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातपुते बोलत होत्या. या कार्यशाळेला दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुंभोजकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखेडकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या समन्वयक ऍड. मनीषा बर्गे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तेजस्वी सातपुते म्हणाल्या, समाजामध्ये आजही महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून वाढत्या अत्याचारांबाबत समाजही सकारात्मक जागृत होत असल्याचे चित्र आहे. समाजामधील ज्या महिलांनी संघर्ष करुन आपले ध्येय गाठले आहे, अशा महिलांच्या प्रेरणादायी यशकथांना माध्यमांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी, यामुळे महिलांच्या विकासाला मदत होईल.
” न्या. कुंभोजकर म्हणाले, “”स्त्रियांच्या जन्मापूर्वीपासून ते मृत्यूपर्यंत कायदे असून या कायद्यांची माहिती महिलांना झाली तरच महिला सक्षम होतील. महिला काम करीत आहे, अशा ठिकाणी अत्याचार झाल्यास दाद मागण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती असते. 18 वर्षाखालील लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींना तीन लाखांपर्यंतची मनौधैर्य योजनेंतर्गत मदत केली जाते.” अत्याचारग्रस्त महिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी व सहाय्य दिले जाते, याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही कुंभोजकर यांनी केले.
विद्युत वरखेडकर म्हणाल्या, “”महिलेवर अत्याचार होत असल्यास कुठे संपर्क साधावा याची माहिती वृत्तपत्रांनी प्रसिद्ध करावीे. तसेच प्रत्येक महिलेने कायद्याचे ज्ञान मिळविण्याबरोबरच स्वत:च्या संरक्षणासाठी मार्शल आर्ट शिकून स्वत:च्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे.” हरीष पाटणे म्हणाले, “कुठल्याही महिलेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून अशा महिलांच्या मागे प्रसारमाध्यमांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे.’
अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी येथील पत्रकार नेहमीच पाठीशी उभा राहिला आहे, यापुढेही असेच ठामपणे उभे राहतील, असे विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी श्रीमती ढवळे, ऍड. मनीषा बर्गे यांनीही महिलांविषयी असणाऱ्या कायद्यांची विस्तृत माहिती दिली. पत्रकारांना महिलांविषयी असणाऱ्या कायद्याची माहिती व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचलन ऍड. सुचित्रा घोगरे- काटकर यांनी केले. जिल्हा संरक्षण अधिकारी चेतन भारती यांनी आभार मानले.