मीरा भाईंदर (ठाणे) : राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रचंड धुमाकूळ सुरु आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंचे दुकाने हे फक्त सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. तर इतर सर्व दुकानं बंदी ठेवण्याचे आदेश देण्यात आला आहे.
मात्र, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या या आदेशांचं उल्लंघन करुन काही बारचालक अजूनही सर्सासपणे मद्यविक्री आणि डान्सबार सुरु ठेवत असल्याचं समोर आलं आहे. मात्र, अशाच एका डान्सबारवर मीरा भाईंदर महापालिका आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी थेट बारवर बुलडोझर चालवला आहे. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बारचालकाला आपल्या कृत्याची शिक्षाच मिळाली आहे.
मीरा भाईंदर पालिका आणि शहर पोलिसांनी कडक लॉकडाऊनमध्ये चोरीछुपे लेडीज बार सुरु ठेवणाऱ्या बारवर चक्क बुलडोझर फिरवला आहे. सध्या राज्यभर कडक लॉकडाउन सुरु आहे. असं असताना काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानसी बार हा रात्री चोरीछुपे सुरु ठेवला जात होता. या बारमध्ये मुली लपवण्यासाठी तळघरही तयार करण्यात आला होता. प्रशासन आणि पोलिसांनी याबाबतची गंभीर दखल घेत कारवाई केली.
गेल्या आठवड्यात काशिमीरा पोलिसांनी रात्री तीन वाजेच्या सुमारास मानसी लेडीज बारमध्ये धाड टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत 7 मुलींसह 2 तृतीयपंथीयांचे सुटका करण्यात आली. तर ग्राहक आणि स्टाफसहित 19 आरोपींना अटकही करण्यात आलं होतं. मानसी बार अनधिकृत असल्याने पोलिसांकडून पालिकेला मानसी बारवर तोड कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले होते. त्यावर आज मीरा भाईंदर पालिकेनं अनधिकृत बांधकाम पथकाच्या साहाय्याने मानसी लेडीज बार भुईसपाट करुन टाकलं.