अमेरिकी कारवाईत मारला गेल्याचे ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट
वॉशिंग्टन: अमेरिकेने खात्मा केलेला अल्-कैदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा हाही मारला गेल्याचे वृत्त महिनाभरापूर्वी आले होते. त्यावर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
अफगाणिस्तान-पाकिस्तान विभागात अमेरिकेने महत्वपूर्ण दहशतवादविरोधी कारवाई केली. त्यामध्ये हमजा बिन लादेन ठार झाला, असे निवेदन ट्रम्प यांनी जारी केले. मात्र, हमजा मारला गेल्याचे नेमके ठिकाण आणि वेळ यासंबंधीचा तपशील ट्रम्प यांनी नमूद केला नाही. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी न्यूयॉर्क टाईम्सने हमजाच्या खात्म्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, त्या वृत्ताला दुजोरा देण्यास त्यावेळी ट्रम्प यांनी नकार दर्शवला होता.
हमजाचे अखेरचे जाहीर निवेदन मागील वर्षी जारी करण्यात आले होते. त्यावेळी त्याने सौदी अरेबियाला धमकी दिली होती. त्यानंतर सौदीने चालू वर्षी मार्चमध्ये हमजाचे नागरिकत्व रद्द केले. खतरनाक जागतिक दहशतवादी अशी ओळख बनवलेल्या ओसामाचा अमेरिकेने 2011 मधील धडक कारवाईत खात्मा केला. ती कारवाई पाकिस्तानच्या अबोट्टाबादमध्ये करण्यात आली.