पुणे – शहरात बेकायदा पिस्तूल आणि काडतुसांची विक्री करणाऱ्या “लादेन टोळी’चा स्वारगेट पोलिसांनी पर्दाफाश केला. पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगारासह साथीदारांना पकडून 11 गावठी पिस्तूल आणि 31 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. ही टोळी गुन्हेगारांना पिस्तूल पुरवत होती. या टोळीने पुरवलेल्या पिस्तूलाचा वापर करुन वानवडी येथे एका वाळू व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. तर वेल्हा येथील हॉटेल व्यावसायिकावर पाणी बॉटलच्या वादातून गोळीबार करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. बारक्या उर्फ प्रमोद पारसे, राजू जाधव ( 20 , रा. माणगाव, हवेली), बल्लूसिंग शिकलीगर (रा. निमखेडी, बुलढाणा), लादेन उर्फ सोहेल आसंगी (रा. टेल्को कॉलनी, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे.
बेकायदा शस्त्रप्रकरणी वानवडी येथील प्रकरणाचा तपास सुरू असताना “प्रमोद पारसे स्वारगेट पीएमपीएल बसस्थानकाजवळ त्याच्या मित्राची वाट पाहात आहे. त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे,’ अशी माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी प्रमोदला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली जात असताना त्याने इतर आरोपीची नावे सांगितली.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरुण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश काटे, भूषण उंडे, बाबासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
प्रथमच मुख्य वितरक लागला हाती
यातील राजू आणि प्रमोद हे दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. बल्लूसिंग हा मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर रहातो. तो 15 हजारांना पिस्तूल आणून त्याचे वितरण करण्यासाठी राजू आणि प्रमोदला देत होता. तर हे दोघे त्या पिस्तूलांची पुढे विक्री करण्यासाठी लादेनला देत होते. या पिस्तूलाची विक्री 30 ते 35 हजारांना केली जात होती. बल्लूसिंगवर अगोदर दोन आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत. बल्लूसिंगच्या माध्यमातून प्रथमच पोलिसांच्या हाती पिस्तूलाचा मुख्य वितरक लागला आहे.