130 रुपये किलो भावाने होणार लाडू-चिवड्याची विक्री, गरिबांसाठी विशेष उपक्रम

पुणे,- शहर आणि परिसरातील गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दि पुना मर्चंट्‌स चेंबरकडून मागील अनेक वर्षांपासून चालविण्यात येणाऱ्या “रास्त भावात लाडू-चिवडा विक्री’ उपक्रमास सोमवारपासून (दि.9) सुरूवात होणार आहे.

“ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालणाऱ्या या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. यंदा लाडू आणि चिवड्याची 130 रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होणार आहे. विशेष म्हणजे करोनाच्या पार्श्‍वभूमीवर कामगारांची दररोज तपासणी, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन केले जाणार आहे.

सोमवारी दुपारी 4 वाजता बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे पणन संचालक सतिश सोनी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन होणार आहे. यावेळी राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड उपस्थित राहणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड, माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, संचालक रायकुमार नहार, कन्हैयालाल गुजराथी आदी उपस्थित होते.

ओस्तवाल म्हणाले, उत्तम दर्जाचे साहित्य वापरून पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे लाडू आणि चिवडा बनविण्यात येत आहे. यंदा 9 ते 16 नोव्हेंबर या कालावधित लाडू आणि चिवडा विक्री होईल. तेल, चणा डाळीच्या किंमतीत वाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लाडूच्या दरात किलोमागे 20 रुपये, तर चिवडा 15 रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी दीड लाख किलो इतकी लाडू आणि चिवड्याची विक्री झाली होती. यंदाही तेवढी विक्री होईल, अशी आशा आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.