पुणे – सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडे लाखोंचे घबाड

पावणेदोन कोटींची बेहिशेबी मालमत्ता : गुन्हा दाखल

पुणे – पोलीस निरीक्षकाच्या विरोधातील तक्रार अर्जाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली. त्यामध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडे 1 कोटी 87 लाख 42 हजार रुपयांची (अपसंपदा) बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. पथकाकडून अधिकाऱ्याच्या बारामती, निरगुडे येथे असलेल्या मालमत्तांचे पंचनामे करण्यात येत आहेत.

यशवंत दादासाहेब ओंबासे (63) असे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचे नाव असून त्यांचा मुलगा तुषार यशवंत ओंबासे (35, दोघे रा. निरगुडे, ता. इंदापूर) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत भीगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा पोलीस ठाणे येथून यशवंत ओंबासे हे पोलीस निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यावरून एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक कांचन जाधव यांनी ओंबासेंच्या मालमत्तेची चौकशी केली. दि. 1 सप्टेंबर 1978 ते 31 मे 2013 या परीक्षण कालावधीत यातील यशवंत ओंबासे यांचे उत्पन्न 3 कोटी 20 लाख 1 हजार रुपये एवढे आहे. या कालावधीत त्यांचा एकूण खर्च 5 कोटी 74 लाख 43 हजार रुपये एवढा झाला आहे. एकंदरीत यशवंत ओंबासे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 3 कोटी 26 लाख 63 हजार रुपयांची मालमत्ता संपादित केली आहे. चौकशीमध्ये त्यांनी 1 कोटी 87 लाख 42 हजार रुपयांची (एकूण टक्‍केवारी -183.92 %) अपसंपदा धारण केली असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये मुलगा तषार याने त्याला अपप्रेरणा दिली असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक दत्तात्रय भापकर हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.