पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी शहराच्या मध्यवर्ती भागांत शनिवारी गर्दी केली होती. मात्र, पार्किंगचा अभाव, अतिक्रमणे, नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे मध्यवर्ती भागांत प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
यामुळे नागरिकांना खरेदीचा आनंद मात्र मनसोक्तपणे लुटता आला नाही. यामध्ये वाहतूक पोलिसांचे नियोजनही ढासळलेले दिसले.
खरेदीसाठी अनेकजण सहकुटूंब आल्याने चारचाकी वाहनांची संख्या मोठी होती. इतरवेळी दुचाकी पार्किंगसाठी मारामार असताना अचानक चारचाकी वाहने प्रचंड संख्येने लक्ष्मीरस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता येथे दाखल झाली.
पार्किंगची पुरेशी सोय नसल्याने अनेकांनी चालकांना गाडीत बसवून गाडी मुख्य रस्त्यावरच उभी केली. तर अनेक जणांनी दंडाची काळजी न करता दुकानाजवळच वाहने उभी करून खरेदीची संधी साधली होती.
यामुळे मुख्य लक्ष्मी रस्ता तर जाम झालाच; मात्र गल्लीबोळांतून मार्ग काढण्याच्या नादात अनेकांनी उलट्या दिशेने वाहने आणली. यामुळे सर्वच रस्ते जाम झाले. पुढे जाण्याच्या नादात कोणीच वाहनचालक मागे हटण्याचे नाव घेत नव्हते. यामुळे अनेक ठिकाणी वादावादीच्या घटनाही दिसल्या.
पार्किंगचे नियोजन आवश्यकच
मागील काही वर्षांत महापालिका आणि वाहतूक पोलीस मिळून लक्ष्मी रस्त्यालगतच्या शाळा आणि संस्थांची मैदाने शनिवार व रविवार पार्किंगसाठी मोफत उपलब्ध करुन देत होते. तसेच अतिरिक्त मनुष्यबळही रस्त्यावर ठेवले जात होते.
मात्र, या वेळी असे कोणतेच नियोजन दिसले नाही. रविवारी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी योग्य नियोजन न केल्याने पुणेकरांच्या खरेदीवर विरजण पडण्याची शक्यता आहे.
पोलीस म्हणतात…
नदीपात्रात वाहने लावून नागरिक शिवाजी रस्त्याने मोठ्या प्रमाणात चालत लक्ष्मीरोडला खरेदीसाठी येत होते. यातच रविवार पेठ, बोहरी अळी, फडके हौद चौकातही खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली. नागरिक दुचाकीवर बसूनच खरेदी करत होते.
तर, दिसेल तेथे वाहने लावली जात होती. यामुळे कोंडीत भर पडल्याचे फरासखाना वाहतूक विभागाचे अधिकारी समीर सावंत यांनी सांगितले.