नांदुर -करोना विषाणूच्या संकटात ग्रामीण अर्थचक्रातील महत्त्वाचा भाग असलेले आठवडे बाजार पूर्णत: ठप्प झाले आहेत. दौंड तालुक्यातील महत्त्वाचे बाजार बंद असल्याने फिरते व्यापारी, दुकानदार, छोटे उपहारगृह यांची ऐन हंगामात कोंडी झाली आहे. आर्थिक चक्र थांबल्याने भविष्याचे नियोजन करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाळ्यापूर्वी करायच्या दुरुस्ती, शेती अवजारे, अन्न-धान्य खरेदी बंद पडल्याने ग्रामीण भागातील शेतकरी पुढचे चार महिने कसे काढायचे, असा प्रश्न पडला आहे.
करोनाच्या संकटात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आठवडी बाजारांना सर्वाधिक फटका बसला आहे. या बाजारांमध्ये भाजीपाला, फळे यांच्यासह कडधान्य, कपडे, सुकी मासळी, गावठी कोंबडी, बाबूंच्या टोपल्या, लाकडी वस्तू, शेती अवजारे आणि हंगामी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती. पावसाळ्यापूर्वी करायच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक लोखंडी, लाकडी अवजारे, नाल, पागा, नांगर दुरुस्ती अशी कामे करण्यासाठी हे आठवडी बाजार महत्त्वाचे ठरत होते.
पावसाळ्यापूर्वी घरदुरुस्ती, छप्पर दुरुस्तीच्या कामांसाठीची आवश्यक साधनसामग्री मिळण्यासाठीही आठवडे बाजारांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक बाजारात गाय, म्हैस, बैल आणि बकऱ्यांची खरेदी-विक्रीही होत होती. आठवडे बाजार बंद पडल्याने या खरेदी-विक्रीला मोठा फटका बसला आहे. या दोन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळत असते. मात्र यंदा काही हाती न लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसुन येत आहे. तर बाजारामधील हॉटेलातही गावकऱ्यांची गर्दी होत असते. यामधून लाखोंची उलाढाल होत असते.
शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव
लॉकडाऊनपासूनच शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी केलेला भाजीपाला, कांदा, वांगी, टोमॅटो, कोबी, मिरची आदींची मध्यस्थांच्या साखळीकडून बाजारात मात्र अव्वाच्या सव्वा किंमतीने विक्री केली जात आहे. आता कुठे हाती शेतमाल आला तर व्यापारी कमी भावात खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. बाजार समित्या कधी सुरू तर कधी बंद अशी स्थिती आहे. अशा अडचणीत शेतकरी सापडला असताना शेतकऱ्याने काय करायचं असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
मागील वर्षीपेक्षा यंदा टोमॅटो पिकाला खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. शेतामध्ये 24 किलोच्या टोमॅटो क्रेटला 100 रुपये दर मिळत आहे, त्यामुळे चालू वर्ष तोट्यात गेले आहे. केलेला खर्चही निघला नाही. तो कसा भरुन काढायचा असा प्रश्न पडला आहे.
-रामदास कोकरे, शेतकरी, नांदुर