– डॉ. राजू गुरव
पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आवारात कचऱ्याचे ढीग पडले आहेत. शौचालयाची दुरवस्था झाली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधी पसरल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध नाही. अस्ताव्यस्त वाहने लावली जात असल्याने ये-जा करण्यास जागा रहात नाही.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आवारात अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण, समग्र शिक्षा अभियान, शालेय पोषण आहार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही राज्यस्तरावरील कार्यालये आहेत. पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक, वेतन पथक, शाळा न्यायाधिकारी ही कार्यालयेही याच आवारात आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. राज्यभरातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी, कर्मचारी सतत कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त या ठिकाणी येत असतात. त्यामुळे ही सर्वच कार्यालये नेहमी गर्दीने गजबजलेली असतात.
कार्यालय आवारात ठिकठिकाणी कचरा जमा झाल्याचे दिसून येते. तो उचलण्यासाठी कोणतीच व्यवस्था उपलब्ध नसणे हे आश्चर्यकारक आहे. या कचऱ्यामुळे सतत घाण वास पसरत आहे. यामुळे डासांचे प्रमाणही वाढत आहे. त्यातच अनेकदा कचऱ्याचे ढीग पेटवून देण्यात येतात. यामुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या त्रासाचाही सामना अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना करावा लागतो. कारंज्याचे डबकेही घाणीने भरले आहे.
शौचालय केवळ नावापुरतेच राहीले आहेत. यात पाण्यासह इतर कोणत्याच सुविधा नाहीत. फरशा व इतर साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे. शौचालय लिकच आहेत. परिसरात दुर्गंधी असते. यामुळे महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालय आवाराबाहेर असलेल्या चर्च मधील शौचालयाचा वापर करावा लागतो. अंपगांसाठी स्वतंत्र शौचालय बांधले आहे. मात्र ते अद्याप वापराविना धूळखात पडून आहे. अंपगांसाठी उभारण्यात येणाऱ्या रॅंम्पवर अनेक अडथळ्यामुळे जाणेही जिकीरीचे बनले आहे. कार्यालायांमध्ये वॉटर कूलर बसविले आहेत. मात्र ते कोरडे असतात. या कूलरला पाण्याच्या नळाचे कनेक्शनच जोडलेले नाहीत.
आवारात महापालिकेचे तीन ते चार ठिकाणी नळ आहेत. मात्र, पाणीपट्टी न भरल्यामुळे ते बंद आहेत. यामुळे पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. तीन महिन्यापूर्वी पाण्याची नवीन टाकी आणूणही ती अद्यापही बसवलेली नाही.
कार्यालयाच्या आवारात नागरिकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेले लोखंडी बेन्चेसही तुटलेले आहेत. भंगारमालाचेही ढिग पडले आहेत. बंद असलेल्या भंगार गाड्याही पडून आहेत. कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी राडारोडा पडला आहे. विद्युत केबल धोकादायक अवस्थेत लोंबकळत आहेत. सुरक्षा रक्षकच नेमले नसल्याने कोणीही आवारात प्रवेश करतात. बेकायदा वाहने लावण्याचे प्रकारही सतत घडत आहेत.
सुविधांसाठी शिक्षण आयुक्तांकडेच गाऱ्हाणे मांडणार
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाकडे सर्वच कार्यालयांना सुविधा पुरविण्याची, देखभाल दुरुस्तीची कामे करण्याची जबाबदारी आहे. सुविधा पुरविण्यासाठी गेल्यावर्षी पत्र देण्यात आले होते. मात्र, त्याची गांभीर्याने दखलच घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा मागण्यांबाबतचे पत्र देण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची भेट घेणार असून त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या राज्य कर्मचारी संघटनेचे नेते नाना वाघ यांनी दिली आहे.