कामगार मतदानापासून राहणार वंचित

संग्रहित छायाचित्र

कुरकुंभ येथील कंपन्यांकडून अर्धवेळही सुट्टी नाही का ?

कुरकुंभ – विधानसभा निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी कंपन्यांनी कामगारांना सुट्टी द्यावी किंवा काही तासांची सवलत द्यायची असेल तर याकरीता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी, असीे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने परिपत्रकात नमूद केले आहे. परंतु, दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एकाही कंपनीने अशी पूर्व परवानगी घेतली नसल्याने संबंधीत कंपनीतील स्थानिक कामगार मतदानापासून वंचीत राहणार का? असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.21) मतदान होत असून या संबंधीची सर्व तयारी मुख्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. यावेळी सरकारी नोकरदार यांना पोस्टाने मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून खासगी क्षेत्रातील सर्व कामगारांना पगारी सुट्टी देण्याची आदेश संबधीत कंपन्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना लक्ष देण्यास सांगितले आहे.

दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ व इतर ग्रामीण ठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक कामगार करतात. सोमवारी विधानसभा निवडणूक असल्याने या कामगारांना लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत कंपनी व्यवस्थापकांनी सुट्टी दिली नसल्याचे कामगार सांगतात तसेच काही कामगारांना दोन ते तीन तास सुट्टी देऊन त्वरित कामावर बोलावले जात असल्याचे कामगार सांगत आहेत.

निवडणुकीच्या दिवशी कंपन्यांनी कामगारांना सुट्टी देणे किंवा अर्धवेळ सुट्टी देणे गरजेचे आहे मात्र, हा अधिकारही डावलला जात असल्याने संबंधीत कंपन्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी कामगार करीत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला खासगी कंपनी व्यवस्थापन पायदळी तुडवत असल्याने निवडणुकीच्या दिवशी कामगारांना कामावर येण्याचे सांगत आहेत.

खासगी क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजाण्यासाठी कामगार व निवडणूक विभागाने कामगारांना पगारी सुट्टी देण्यात आली असून यासंबंधी कामगार आयुक्त यांना निवडणूक आयोगाकडून कामगार मंत्रालयाला पत्र व्यवहार केला आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
– प्रमोद गायकवाड निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)