मॉस्को – संसदीय निवडणुकांच्या वादग्रस्त निकालांनंतर देशभर भडकलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किरगीझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकोव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
जीनबेकोव यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून आणि राजकीय विरोधकांकडून केली जाऊ लागली होती. त्यामुळे आता सत्तेवर कायम राहणे हे देशाच्या एकसंघतेला आणि देशांतर्गत सौहार्दाला अनुसरून नाही.
किरगीझस्तानमधील शांतता, अखंडता, जनतेचे ऐक्य आणि समाजातील सौहार्द कायम रहाणे ही अन्य सर्व गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाची बाब आहे, असे जीनबेकोव्ह यांच्या कार्यालयाने प्रासिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
चीनच्या सीमेला लागून असलेल्या किरगीझस्तानची लोकसंख्या जेमतेम 65 लाख इतकी आहे. तिथे 4 ऑक्टोबरला झालेल्या मतदानानंतर जाहीर झालेल्या निवडणुकीत सरकारच्या बाजूच्या राजकीय पक्षांना बहुमत मिळाले होते. मात्र या निवडणुकीत मतांची खरेदी आणि अन्य गैरप्रकार झाले असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
त्यानंतर भडकलेल्या आंदोलनात सरकारी इमारतींची जाळपोळ, काही कार्यालयांची लुटालूट सुरू झाली. म्हणून निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली आणि अध्यक्ष जीनबेकोव्ह यांना हटवण्याची योजना जाहीर केली.
आंदोलन सुरू असतानाच अध्यक्ष जीनबेकोव्ह यांनी माजी खासदार सादिर झपारोव्ह यांची तुरुंगातून सुटका करून नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली होती. झपारोव्ह यांनी जीनबेकोव्ह यांच्या राजीनाम्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते.
नवीन सरकार सत्तेवर आले आणि अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतरही राजधानी बिश्केक इथे तणावाचे वातावरण कायम अहे.