कुसुमाग्रजांच्या कविता वाचन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

मराठी भाषा गौरव दिन 2021

नवी दिल्ली – “मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाच्यानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन साहित्य रसिकांना करण्यात येत आहे.

वि.वा शिरवाडकरांचे एकूण 24 कविता संग्रह, 3 कादंबऱ्या, 16 कथा संग्रह, 19 नाटके, 5 नाटिका व एकांकी आणि 4 लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिध्द आहे. 1964 मधील गोव्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वर्ष 1974 मध्ये त्यांच्या “नटसम्राट’ ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला वर्ष 1987 मध्ये “ज्ञानपीठ पुरस्कार’ही मिळाला.

कुसुमाग्रजांच्या 24 कविता संग्रहांमध्ये “जीवनलहरी’, “विशाखा’, “समिधा’, “किनारा’, “मेघदूत’ (अनुवाद), “मराठी माती’, “स्वगत’, “जाईचा कुंज’ (बालकविता), “हिमरेषा’, “वादळवेल’, “रसयात्रा’, “छंदोमयी’, “मुक्तायन’, “श्रावण’, “प्रवासी पक्षी’, “पाथेय’, “बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज’, “माधवी’, “महावृक्ष’, “करार एका ताऱ्याशी’, “चाफा’, “मारवा’, “अक्षरबाग’, “थांब सहेली’ या काव्यसंग्रहांचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या या 24 काव्य संग्रहातील निवडक कविता व्हिडीओ स्वरूपात या कार्यालयास पाठवाव्यात. सुस्पष्ट उच्चार व उत्तम सादरीकरण असणाऱ्या कविता वाचनाची कार्यालयाच्या संपादन मंडळाकडून निवड झाल्यावर ट्‌विटर, फेसबुक, युटयूब, इंस्टाग्राम आदींद्वारे प्रसिध्दी देण्यात येईल.

कविता वाचणाऱ्या व्यक्तीने स्वत:चा अल्प परिचय, कवितेचे शिर्षक व कविता संग्रहाचे नाव याची थोडक्‍यात माहिती द्यावी. कार्यालयाच्या वतीने दिनांक 14 ते 27 फेब्रुवारी 2021 या कालावधीत कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ प्रसारीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी 98991141130 आणि 9871742767 या व्हाट्‌सअप क्रमांकांवर रचना पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.