तीन हजार कोटींचा कुंद्राचा ऑनलाईन “गेम’; भाजपा नेते राम कदम यांचा आरोप

मुंबई – राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम “गॉड’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुबाडले. तसेच, गॅम्बलिंग गेमद्वारे पैसे उकळले आणि वितरणाच्या नावाखाली गरिबांचे पैसै लुटले असल्याचाही आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.

राज कुंद्राने या गेमच्या प्रचारासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव व फोटोंचा वापर केला होता. राजु कुंद्राने ऑनलाईन गेम गॉडच्या माध्यमातून फसवणूक केली. विआन कंपनीचा गॉड नावाचा एक खेळ आहे. तो कायदेशीर ऑनलाइन गेम असल्याचे सांगितले होते. या खेळाच्या माध्यमातून 2500 ते 3000 कोटींचा घोटाळा विआन इंडस्ट्रीने केला आहे, असे कदम म्हणाले.

ऑनलाईन गेमच्या नावाखाली कुणाकडून 30 लाख तर कुणाकडून 15 ते 20 लाख रुपये घेतले गेले. गेमच्या डिस्ट्रीब्यूशनच्या नावाखाली लोकांना फसवलं गेलं व त्यांचे पैसे लुटले. काही जणांना डिस्ट्रिब्यूटरशिप दिली तर काही जणांना तसंच ठेवलं. काहींना तत्काळ लक्षात आलं की ही फसवेगिरी आहे.अशाप्रकारे गरिबांना लुटण्याचा अधिकार राज कुंद्राला कुणी दिला? असा सवालही राम कदम यांनी केला आहे.

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला सेबीचा दंड
राज कुंद्रा व पत्नी- अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना सेबीने बुधवारी दंड ठोठावला. उभयतांच्या विआन इंडस्ट्रीजवर समभाग गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करताना भांडवली बाजार नियामकाने 3 लाख रुपये भरण्याचा आदेश जारी केला. हिंदुस्थान सेफ्टी ग्लास इंडस्ट्रीज म्हणून ओळखले जाणाऱ्या विआन इंडस्ट्रीजचे राज व शिल्पा प्रवर्तक आहेत. 10 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणारी विआन इंडस्ट्रीज भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनी आहे. राज ऊर्फ रिपू सुदन कुंद्रा व शिल्पा शेट्टी कुंद्रा संचालक असलेल्या विआन इंडस्ट्रीजची सप्टेंबर 2013 ते डिसेंबर 2015 दरम्यान करण्यात आलेल्या चौकशीवर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.