Kunal Kamra : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली.
सध्या कुणाल कामराच्या गाण्यामुळे निर्माण झालेला तणाव वाढत चालला आहे. त्याच्याविरोधात राजकीय स्तरावरही संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अधिक चिघळत आहे.
काल रात्री अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि खार पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, कामरा मुंबई सोडून फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अश्यातच या घटनेवर आता स्वतः कुणालनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
त्यानं यावर थेटपणे कुठलंही भाष्य केलेलं नाही, पण हातात भारतीय राज्यघटनेची एक प्रत घेऊन त्यानं फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं, ‘The Only Way Forward’. यामधून त्याला सुचवायचं असेल की, आव्हानावर मात करण्यासाठी भारतीय संविधान हाच सर्वात आशादायी मार्ग आहे. सध्या त्याची ही इंस्टारग्राम पोस्ट चर्चेत आली असून, मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
काय म्हणाले होते कुणाल कामरा?
शिवसेना भाजप पक्षामधून बाहेर आली. पुढे शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. त्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. एका मतदाराला ९ बटन दिले. यामुळे सर्व संभ्रमात पडले. एकाने पक्ष चालू केला होता. ते खूप मोठा जिल्हा ठाणे, तिथून येतात, असा टोला कुणालने कवितेतून लगावला आहे. यांचे हे राजकारण आहे. त्यांना घराणेशाही संपवायची होती. त्यामुळे कुणाचा बाप चोरून घेतला.
आता काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का, त्याला सांगतो चल भाई जेवण करुयात. त्याच्या वडिलांचे कौतुक करतो आणि सांगतो, भाई तुझा बाप आजपासून माझा बाप, असा मिश्किल टोला कामराने लगावला. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.