उन्नाव- देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीची आमदारकी अखेर रद्द करण्यात आली आहे. कुलदीप सेंगर असं आरोपीचं नाव असून, बलात्कार प्रकरणात पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर भाजपाने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. सेंगर यांची आमदारकी रद्द केल्याची अधिसूचना आज काढण्यात आली.
कुलदीप सेंगर याने एका तरुणीचे अपहरण करून बलात्कार केला होता. अत्याचाराची घटनेवेळी पीडिता अल्पवयीन होती. याप्रकरणी पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पीडितेसह तिच्या कुटुंबीयांवर आरोपीकडून दबाव आणण्यात आला. तिच्या वडिलांचा कोठडीतच मृत्यू झाल्यानंतर पीडितेवरही प्राणघातक हल्ले करण्यात आले.
कार अपघातात तिच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला होता. तर पीडिता गंभार जखमी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात पीडितेनं सरन्यायाधीशांना पत्र लिहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेत लखनऊ पोलिसांना फैलावर घेतले होते. तसेच तातडीनं सुनावणी घेण्याचे आदेश दिल्लीतील तीसहजारी न्यायालयाला दिले होते. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने अरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभेने कुलदीप सेंगर यांची आमदारकी रद्द केली आहे. याविषयीची अधिसूचना विधानसभेचे मुख्य सचिव प्रदीप कुमार दुबे यांनी जारी केली आहे. कुलदीप सेंगर उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.