लाहोर – हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानातील तुरुंगात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळवून देण्यासाठी पाकिस्तान तयार झाला असून शुक्रवारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत दिली जाणार आहे.
कुलभुषन जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. तर, तीन वर्षांपासून कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती.
परंतु, आजपर्यंत पाकिस्तानने जाधव यांना राजनैतिक मदत मिळवून दिलेली नव्हती. कुलभूषण जाधव यांना “हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या निर्णयाविरोधात 8 मे 2017 रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.