कुकुडीचे पाणी पेटणार!

पाटबंधारे विभागाचे कार्यालय नगर जिल्ह्यात नेण्यास विरोध

– श्रीकृष्ण पादिर

पुणे – पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग व नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग यांच्यात कुकडीच्या पाण्यावरून होणारे वाद काही नवीन राहिलेले नाहीत. कुकडी सिंचन मंडळ पुणे अंतर्गतचे व कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1च्या अधिपत्याखाली असणारे पिंपळगाव जोगे पाटबंधारे उपविभागीय कार्यालय नगर जिल्ह्यातील अळकुटी (ता. पारनेर) येथे 19 सप्टेंबर रोजी स्थलांतरित होण्याचा निर्णय झाला आहे. याला विरोध म्हणून सोमवारी (दि. 9) आळेफाटा (ता. जुन्नर) येथे सकाळी आंदोलन छेडले जात आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कुकडीच्या पाण्याचे राजकारण आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

पिंपळगाव जोगे धरणातील पाण्याची पारनेर आणि नगर तालुक्‍यातूनही मागणी होत आहे. त्यासाठी विविध आंदोलनेही होत आहेत. आता याच्याशी संबंधित कार्यालयच नगर जिल्ह्यात जात असल्याने या धरणाच्या पाण्यावर नगर जिल्ह्याचा वरचष्मा राहणार असल्याचे बोलले जात आहे. पिंपळगाव जोगे धरणाच्या सिंचनाचे कामकाज पाहणारे हे उपविभागीय कार्यालय सुरुवातीपासून नारायणगाव येथे कार्यरत आहे. कार्यकारी अभियंता आणि अन्य अधिकारी तेथे कार्यरत आहेत. या उपविभागाअंतर्गत चार उपशाखा आहेत. यातील उपशाखांसह उपविभागाचे मुख्यालय आता अळकुटीला स्थलांतरित करण्यात येणार आहे. या कार्यालयाला कळंब, पिंपळवंडी, बेल्हा, अळकुटी व निघोज या उपशाखा जोडण्यात आल्या आहेत. हे उपविभागीय कार्यालय नगर जिल्ह्यात स्थलांतरित होत असले, तरी त्याचे मुख्य नियंत्रण कुकडी प्रकल्पाच्या पुण्यातील अधीक्षक अभियंता कार्यालयातूनच चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कुकडी प्रकल्पाची नारायणगाव येथे असलेली अन्य कार्यालये तेथे राहणार आहेत. पिंपळगाव जोगे धरणाचे लाभक्षेत्र पारनेर तालुक्‍यात जास्त असल्याने सोयीसाठी हे कार्यालय इकडे हलविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

कुकडी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असून धरणांवरील नियंत्रण नारायणगाव येथील कार्यालयातून होते. पिंपळगाव जोगा कार्यालय स्थलांतरित करण्याचा जीआर निघाला असला तरी त्याला माझा विरोध आहे. याबाबत मी जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांना पत्र पाठविले आहे. जुन्नर तालुक्‍यावर अन्याय होईल असा कोणताही निर्णय करता कामा नये. तसा निर्णय झाल्यास या प्रकल्पातील पाण्याचा एकही थेंब जुन्नर तालुक्‍याच्या पुढे जाऊ दिला जाणार नाही. पाणी हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या कोणतीही दिशाभूल होता कामा नये. मला आमदारकी ही जनतेमुळे मिळाली आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचेच निर्णय घेण्यात येतील. बेनके परिवाराने शेतकऱ्यांपेक्षा स्वतःची प्रगती केलेली आहे. युवा नेते अतुल बेनके यांना निवडणुकीची घाई झाली आहे. त्यामुळे हे आंदोलन नसून केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे.
-शरद सोनवणे, आमदार जुन्नर


पिंपळगाव जोगेचे हे कार्यालय स्थलांतरित होणे हे येथील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. जोपर्यंत हा निर्णय स्थगित होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहिल. शिवसेना-भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, त्यांच्या विरूद्ध हे आंदोलन असणार आहे. याचे काहीही परिणाम झाले तरी याची सर्वस्वी जबाबदारी वैयक्‍तिक मी उचलायला तयार आहे. केवळ लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे असे निर्णय होत आहेत. धरणांच्या पाण्याचे नियोजन त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेमुळे असफल झाले आहे. कुकडी प्रकल्पातील धरणांसाठी तालुकावासियांचा मोठा त्याग आहे. अनेकांच्या जमिनी धरणात गेल्या आहेत. मी या तालुक्‍याचा भूमिपूत्र असल्याने त्यांच्यासाठी लढायची माझी जबाबदारी आहे. जुन्नर तालुक्‍यात जेवढे पाणी आवश्‍यक आहे ते मिळाल्यानंतरच उर्वरित पाणी पुढे सोडावे, त्याला आमची हरकत नसेल. याशिवाय आघाडी म्हणून आम्ही एकत्र असल्याने कॉंग्रेसचा आम्हास पाठिंबा असेल.
-अतुल बेनके, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस


पाणीनियोजनच नगर जिल्ह्यातून होणार असेल तर आम्हाला पाणी कसे मिळणार? ज्यावेळी पिंपळगाव जोगा धरण झाले त्यावेळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात गेल्या आहेत. त्यांचे पुनवर्सन अद्यापही योग्यरीत्या झाले नाही. कालवा 50 किमी जुन्नरच्या हद्दीत आहे. या 50 किमीच्या पट्ट्यातील सर्व शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. येथे धरण स्थापनेपासून असणारे कार्यालय स्थलांतर होणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. यापूर्वीही तालुक्‍यात होत असलेले प्रांत कार्यालय, महावितरण कार्यालय मंचरला गेले. आरटीओ कार्यालय जुन्नरला होणार होते ते बारामतीला गेले. त्यामुळे जुन्नरकरांनी किती अन्याय सहन करायचा? हे आंदोलन शेतकऱ्यांचे आहे. या आंदोलनामध्ये आम्ही सोबत आहोत. सरकारदरबारीही भूमिका मांडली जाईल, जिल्हाधिकारी, जलसंपदामंत्री यांना भेटून निवेदन दिले जाईल. त्यामुळे यात कोणतेही राजकारण न आणता या आंदोलनाला भूमिपूत्र म्हणून आमचा पाठिंबा असणार आहे.
-आशा बुचके, सदस्या जि. प. पुणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here