पुणे – पंजाब येथे नुकत्याच झालेल्या 58 व्या रोलर स्केटिंग फेडरेशनच्या राष्ट्रीय चॅंपियनशिपमध्ये फ्रीस्टाइल क्लासिक स्लालम प्रकारामधे पुण्याचे युवा खेळाडू कुहू खांडेकरला ब्रॉंझ मेडल मिळाले आहे. रोलर स्पीड स्केटिंग प्रकारामधे विक्रम इंगळे याने सुवर्ण व सिध्दांत कांबळे याने रौप्य पदक मिळवले आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये कोलंबियामध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेतील भारतीय राष्ट्रीय संघाकड़ून हे तिघेही खेळाडू भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक श्रीपाद शिंदे आणि प्रीती इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कुहू खांडेकरने 4 वर्षांची असल्यापासून स्केटिंग सुरू केले आहे. दै. प्रभातशी बोलताना कुहू म्हणाली की, स्पीड स्केटिंगसाठी माझे प्रशिक्षक श्रीपाद शिंदे आहेत आणि स्लॅलम स्केटिंगसाठी मिस प्रीती इंगळे. प्रत्येक वेळी माझ्या यशामागे माझ्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन खरोखर महत्वाचे ठरते. जर तुम्हाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळामध्ये यश संपादन करायचे असेल तर फिटनेस, आहार, मन आणि शरीरातील विश्रांतीकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.
कुहूने नेहमी लक्ष केंद्रित केलेले हे मुख्य घटक आहेत. तिचे म्हणणे आहे की, तिचे पालक तिच्या यशामधे खूप महत्वपूर्ण घटक आहेत आणि ते नेहमी तिच्या खेळातील प्रगतीकडे लक्ष देतात. कुहू सांगते, तुम्ही वेळेचे जर योग्य व्यवस्थापन केले तर तुमच्या खेळामध्ये तसेच अभ्यासात चांगली कामगिरी करणे शक्य आहे.
कुहू आता दहावीत आहे आणि या वर्षीही ती तिची तंदुरुस्ती, नियमित स्लॅलम सराव आणि अभ्यास सांभाळणार असून आता आगामी जागतिक स्पर्धेतही चांगल्या पद्धतीने स्लालम रेसेस खेळून यश मिळवण्याचा तिचा निर्धार आहे.