पिंपरी – चिखलीतील कुदळवाडी भागात आगीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. आज सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास चिखली एसटीपी प्लांट जवळ 14 ते 15 भंगार दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. यात काही गोदामे आगीत जळून खाक झाली आहे. ही आग इतकी भीषण होती की, हवेत सर्वत्र आगीच्या धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरात काळोख पसरल्याचे पाहायला मिळाले.
या आगीच्या घटनेनंतर चिखली मोशी तळवडे या भागातून दहा ते बारा अग्निशमन बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जिथे आग लागली तिथे भंगार दुकाने व गोदामांची अतिशय गर्दी असून रस्ते देखील अरुंद आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला गाड्या पोहोचण्यास अडचणीचे ठरले. तसेच गोदामामध्ये ऑक्सिजनचे एलपीजीचे सिलेंडर असून या आगीमध्ये त्याचेही स्फोट होत आहेत.
कुदळवाडी भागाकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी वळवली असून या भागातील रस्त्यांवर कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, कुदळवाडी भागात वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असताना येथे उपाययोजना करण्याची गरज आहे. भर वस्तीत आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.