मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या केल्याची बातमी सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेली आहे. 34 वर्षीय सुशांत ने रविवारी वांद्रे येथील आपल्या निवास्थानी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतची ही अकाली एक्झिट सर्वांच्याच जीवाला घोर लावणारी ठरली असून सुशांत आपल्यातून निघून गेला आहे हे सत्य पचवणं जड जातंय.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यू नंतर अभिनेत्री ‘क्रिती सॅनन’ हिने सोशल मीडियावर सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात. क्रितीनं सुशांतसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिनं सुशांतसाठी भावुक मेसेज लिहला आहे.
क्रिती म्हणते कि, “सुश..मला माहित आहे की, तुझं मन, तुझे विचार तुझे सर्वांत चांगले मित्र आणि सर्वांत मोठा शत्रूही तेच होते. तुला जगण्यापेक्षा मरणं सोप्प वाटलं, या विचारानं आज मी पूर्णपणे कोसळले आहे. त्या क्षणी तुझ्या आजूबाजूला काही जण हवे होते.. जे त्या क्षणी तुला यातून बाहेर काढू शकले असते.
काश..तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना तू हा धक्का दिला नसता. काश..तुझ्या मनातली घालमेल मला समजून घेता आली असती…आता हे शक्य नाही…अशा अनेक गोष्टी आहेत… माझ्या काळजाचा एक तुकडा तुझ्या सोबत आहे….आणि तू नेहमीच माझ्यासोबत राहणार आहेस. नेहमीच तुझ्यासाठी प्रार्थना करत होते…आणि यापुढंही करेन…’असं क्रितीनं लिहिलं आहे.