करीना कपूरने बॉलिवूडमध्ये “झिरो फिगर’चा ट्रेन्ड प्रस्थापित केला. तिच्यापासून अनेक अभिनेत्रींनी प्रेरणा घेतली आहे. स्वतःच्या फिटनेसबाबतची जागरुकता हल्लीच्या अभिनेत्रींमध्ये त्यामुळेच वाढीला लागली आहे. त्यापैकी एक कृती सेनन ही देखील आहे. वजन अबाधित राखण्यात ती यशस्वी झाली असली, तरी आता तिला हे वजन वाढवावे लागणार आहे. तिच्या आगामी “मिमी’ साठी तिला तब्बल 15 किलो वजन वाढवावे लागणार आहे.
या सिनेमात तिला सरोगसीच्या विषयावर काम करायचे आहे. त्यासाठी तिला स्वतःचा डाएट वाढवायला लागला. तिचा डाएट चार्ट त्यानुसार बदलला गेला. त्यामध्ये कार्बोहायड्रेड आणि फॅट असलेले पदार्थ वाढवण्यात आले. पनीर, मिठाई, जंक फूड, बटाटे, शकरकंद, दूध आणि तळलेल्या पदार्थांची रेलचेल तिच्या आहारामध्ये वाढवली गेली आहे. एरवी या पदार्थांपासून दूर पळनाऱ्या कृतीला या पदार्थांवर ताव मारावा लागतो आहे. इतके की भूक नसतानाही तिला हे पदार्थ नियमितपणे हादडावे लागत आहेत. एवढा हेवी डाएट घेण्याची कृतीला सवय नाही. कमी वेळात वजन वाढवण्यासाठी तिचा अट्टहास चालला आहे. मात्र या काळात ती अन्य कोणतेही काम करू शकणार नाही.