जयवंत आदर्श कृषी योजनेचे यश; तीन वर्षांत सात हजार 255 शेतकऱ्यांचा सहभाग
कराड – यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या संतोष लकेसर या सभासदाने प्रति एकरी 133 टन इतके उच्चांकी ऊस उत्पादन घेत कृष्णा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी जयवंत आदर्श कृषी योजना सुरु केली आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून प्रतिएकरी 100 टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
गेल्या तीन वर्षात या योजनेत 7 हजार 255 शेतकरी सभासद सहभागी झाले असून 335 शेतकऱ्यांनी प्रतिएकरी 100 टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेतले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या ऊसपिकाची विविध अवस्थेतील निरीक्षणे, ऊस विकास विभागातील सर्कल ऑफिसर व शेती मदतनीस यांच्यामार्फत मार्गदर्शन व माहिती संकलित केली जाते. तसेच सहभागी शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत विविध सुविधा पुरविण्यात येतात.
या योजनेत सहभागी झालेले दुधारी (ता. वाळवा) येथील शेतकरी सभासद संतोष पिराजी लकेसर यांनी उत्कृष्ट नियोजनाने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येते, हा प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे. त्यांच्या 42 गुंठे क्षेत्रातील कारखान्याकडे गळितास आलेल्या ऊसाचे उत्पादन 140.305 मेट्रीक टन म्हणजेच प्रतिएकरी 133.620 मेट्रीक टन इतके आहे. या शेतकऱ्याच्या शेतीची पाहणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, राजारामबापू सहकारी बॅंकेचे संचालक आनंदराव लकेसर, नंदकुमार पाटील, विश्वास पाटील, रंगराव पाटील, अरुण यादव, जयवंत कदम, अधिक जाधव, अमोल लकेसर, पांडूरंग निकम, शामराव कदम, किशोर पाटील, माणिक निकम, धनाजी मोरे, मुख्यशेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह ऊस विकास व शेतकी विभागातील कर्मचारी व प्रगतशिल शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.