सावधान! सांगली जिल्ह्यात प्रचाराला येताय ? कृष्णेचे उमेदवार अन् प्रमुख कार्यकर्त्यांची होणार कोरोना टेस्ट

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

इस्लामपूर (विनोद मोहिते) – यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीचा प्रचार चुरशीने सुरू झाला आहे. कारखाना सातारा जिल्ह्यात असला तरी कार्यक्षेत्र सांगली जिल्ह्यातही आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी वाळवा तालुक्यातील दहा गावात भेट दिल्या.

इथे काही गावांत कृष्णेचे उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांची वर्दळ वाढल्याचे चर्चेतून पुढे आले. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण वाळवा तालुक्यात आहेत.चिंताजनक असणारी वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी श्री. डुड्डी यांनी विविध सूचना केल्या आणि कृष्णेचे उमेदवार अन् प्रमुख कार्यकर्ते गावात येताच कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले.

सर्व उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांनी टेस्टिंग करून घेण्याबाबत श्री.डुड्डी म्हणाले,” जर एखादा परगावचा उमेदवार गावांमध्ये प्रचारासाठी येत असेल तर त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावी. मगच प्रचार करावा. तिथे सोशल डिस्टन्स पाळावा, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर वापरावे, तसेच उमेदवारांनी ही सामाजिक भान ठेवून जास्तीत जास्त सोशल मीडिया मार्फत प्रचार करावा.”

निवडणुकीत १७ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी १८ जूनला जाहीर होणार त्यानंतर प्रचाराला गती येणार आहे. २९ जूनला मतदान तर एक जुलैला मतमोजणी होणार आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्रातील कृष्णा कारखान्याचे ४७ हजार १६० सभासद आहेत.

वाढता कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी श्री डुड्डी यांनी विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करा. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हाय व लो रिस्क लोकांचा शोध घ्या. गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण कक्षाची कडक अंमलबजावणी करा अशा सूचना दिल्या. यामुळे यावर तातडीने पावले उचलण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आज गुरुवारी कासेगाव,तांबवे,नेर्ले, पेठ, रेठरे धरण,कामेरी,बोरगाव, जुनेखेड,वाळवा, बागणी येथे भेटी दिल्या. यातील बहुसंख्य गावात कृष्णेचे सभासद आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा,कडेगाव व पलूस तालुक्यातही सभासद आहेत. इथंही गर्दी वाढत आहे.

निवडणुकीत तीन पॅनेल कडून अर्ज दाखल झाले आहेत. विद्यमान अध्यक्ष सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयवंतराव भोसले सहकार पॅनेल, माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनेल, माजी अध्यक्ष इंद्रजीत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनेल तर्फे अर्ज दाखल झाले आहे. निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. यामुळे तीनही पॅनेलकडून प्रचारासाठी गर्दी होत आहे. १९ दिवसांवर निवडणूक आहे. यामुळे कोरोना वाढू शकतो. तो रोखण्यासाठी श्री. डुड्डी यांनी उमेदवार अन् प्रमुख कार्यकर्त्यांची कोरोना टेस्ट करा अशा सूचना केल्या आहेत.याची अंमलबजावणी कशी होते ? पॅनेल प्रमुख काय निर्णय घेतात ? प्रचाराचे स्वरूप कसे राहील ? याकडे सभासदांचे लक्ष असेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.