पुणे – गणेशोत्सवानंतर राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. गृहविभागाने 25 अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मुंबईत आयजी प्रशासन म्हणून कार्यरत होते, त्यांचे सध्याचे अप्पर महासंचालक पद विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीमध्ये अवनत करण्यात आले आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली अपेक्षित असताना तिचे आदेश आले नाहीत.
डॉ. के. व्यंकटेशम कायम?
पुणे शहर पोलीस दलातील अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांची देखील बदली करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांची बदली करण्यात आली असली तरी त्यांच्या बदलीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांची पदोन्नतीने मुंबई शहर पोलीस दलातील सशस्त्र पोलीस बलाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर डॉ. के. व्यंकटेशम यांची पोलीस आयुक्तपदी दोन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, त्यांना तूर्त पुणे आयुक्तपदी कायम ठेवण्यात आल्याचे समजते, त्यांची पदोन्नतीवर बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संदीप पाटील यांची गडचिरोलीला बदली
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पदोन्नतीवर पोलीस उपमहानिरीक्षकपदी(नागपूर परीक्षेत्र) गडचिरोलीला बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नसली तरी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि सोलापूरचे अधीक्षक मनोज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.