करोनामुक्‍तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलची “सेंच्युरी’

जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक; कराड तालुक्‍यातील 19 जणांना डिस्चार्ज

कराड  -जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून सोमवारी दि. 1 जून रोजी 19 जण करोनामुक्‍त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने 100 करोनाबाधित रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना करोनामुक्‍त केले आहे. करोनामुक्‍तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने “सेंच्युरी’ मारली असून या योगदानाचे जिल्हाधिकारी सिंह यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख,कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, कॉन्ट्रॅक्‍टर दीपक रैनाक यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यात करोनाने मोठा हाहाकार माजवला आहे. अगदी पहिल्या टप्प्यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले.

त्यातही कराडमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या करोना विशेष वॉर्डमध्ये करोना पॉझिटिव्ह रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला आणि दि. 18 एप्रिल रोजी कराड तालुक्‍यातील तांबवे गावच्या पहिल्या करोनामुक्‍त रूग्णाला टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलने यशस्वी उपचाराने करोनामुक्‍त झालेल्या रूग्णांना सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्याची मालिकाच सुरू केली. त्यामुळे लोकांमधील करोनाबद्दलची भीती कमी होण्यास मदत झाली.

सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत 100 व्या करोनामुक्‍त रूग्णाला कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक, उंब्रज येथील 40 वर्षीय पुरूष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला व 15 वर्षीय मुलगी, शिरळ-पाटण येथील 26 वर्षीय महिला व 25 वर्षीय महिला, भरेवाडी-पाटण येथील 36 वर्षीय पुरूष, बनपुरी-पाटण येथील 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय युवक, 48 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगा व 8 वर्षीय मुलगा, शितपवाडी-पाटण येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा व 19 वर्षीय युवक, ढेबेवाडी फाटा येथील 23 वर्षीय पुरूष, 44 वर्षीय महिला व 18 वर्षीय मुलगी अशा एकूण 19 जणांचा समावेश आहे. दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करोना विशेष वॉर्डकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाची जिल्हाधिकारी सिंग यांनी पाहणी केली. तसेच अन्य रूग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत कमी कालावधीत कृष्णा हॉस्पिटल व्यवस्थापनाने तयार करण्यात आलेल्या या विशेष मार्गाचे कौतुक केले.

विशेष अभिनंदन
कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत 100 रूग्ण करोनामुक्‍त झाले, ही सातारा जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. करोनामुक्‍तीच्या लढाईत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलचे सर्व डॉक्‍टर्स व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अमूल्य योगदान दिले. मी डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व टीमचे सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष अभिनंदन करतो.
शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा.

Leave A Reply

Your email address will not be published.