ना. डॉ. अतुल भोसले : बॅंकेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
कराड – सभासदांच्या विश्वासामुळे कृष्णा सहकारी बॅंकेने 500 कोटीहून अधिक व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असणाऱ्या कृष्णा बॅंकेचा विस्तार लवकरच देशाच्या कानाकोपऱ्यात करणार असल्याचे प्रतिपादन बॅंकेचे चेअरमन ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
कृष्णा सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी य. मो. कृष्णा सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, बॅंकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, गुणवंतराव पाटील, संजय पाटील, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, राजारामबापू कारखान्याचे संचालक भगवान पाटील, माणिकराव पाटील, आप्पासाहेब कदम, विठ्ठलराव पाटील, प्रसाद पाटील होते.
ना. भोसले पुढे म्हणाले, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पांनी सर्वसामान्य लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृष्णा बॅंकेची स्थापना केली. आज बॅंक शेतकऱ्यांसह महिला, लघुउद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देते. आज मोठे उद्योजक सुद्धा बॅंकेकडे चांगल्या दृष्टीने पाहत आहेत. युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बॅंक कर्ज उपलब्ध करून देत असून त्यांनी उभा केलेले व्यवसाय पाहून आप्पासाहेबांचे स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद होत आहे.
येत्या 10 वर्षाचा बॅंकेचा आराखडा तयार केला असून पहिल्या 5 वर्षात राज्यभर व पुढील 5 वर्षात देशभरात विस्तार करण्याचा विचार आहे. त्यानुसार नवीन चार शाखांचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे दिला आहे. त्यात प्रामुख्याने मुंबईमध्ये बॅंक सुरू करणार आहोत. तसेच आपण येत्या दोन वर्षात 1000 कोटी रुपये व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवले असून ते गाठण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास ना. भोसले यांनी व्यक्त केला.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कोणत्याही संस्थेत स्थिरता महत्त्वाची आहे. कृष्णा बॅंक ही ग्राहकांच्या विश्वासास गेली 48 वर्षे पात्र ठरली आहे. सभासदांना व कर्मचाऱ्यांना कृष्णा बॅंक आपली वाटते. बॅंकेने अडचणीच्या काळातही चांगली वाटचाल केली आहे. बॅंकेचे कार्यक्षेत्र हे सातारा, सांगली, कोल्हापूर पुणे या चार जिल्ह्यात असून आपल्याला संपूर्ण राज्यात व देशात बॅंक पोहचवायची आहे. आज बॅंकिंग क्षेत्रात बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. कृष्णा बॅंकेनेही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय वृद्धी करावी, अशी अपेक्षा यावेळी डॉ. भोसले यांनी व्यक्त केली.
बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांनी अहवाल वाचून दाखविला. याप्रसंगी बॅंकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रदीप थोरात, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, हेमंत पाटील, बाळासो पवार, रणजीत लाड, महादेव पवार, चंद्रहास जाधव, नामदेव कदम, तातोबा थोरात, संतोष पाटील, दिनकर गडाळे, श्रीमती मालन जगताप, नंदाताई थोरात, विजय पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.