मुंबई – आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा ही पुढील वर्षी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. हा थरार पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट रसिक कमालीचे उत्सुक आहेत. आता भारतीय क्रिकेटरसिकांसाठी आणि बॉलीवूड फॅन्ससाठी एक आनंदाची खुशखबर आहे, या स्पर्धेच्या (महिला आणि पुरुष) चषकाचे अनावरण बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर-खानने केले आहे आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबच्या स्टेडियमवरून तिने शुक्रवारी विश्वचषकाचे अनावरण केले. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
१८ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर यादरम्यान, रंगणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. विश्वकरंडकाच्या अनावरणाचा मान मिळाल्याने, करिना कपूर खान सध्या खूश आहे. तिने याबाबत सांगितले की, “माझ्यासाठी ही अभिमानास्पद बाब असून हा माझा मोठा सन्मान आहे. आपले स्वप्न साकार करणाऱ्या क्रिकेटपटूंचा उत्साह वाढवणे हे माझे काम असणार आहे. माझे सासरे महान क्रिकेटपटूंपैकी एक होते. यामुळे मला विश्वकरंडकाची अनावरण करण्याची जबाबदारी देणे, म्हणजे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे”. पुरुषांचा विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे, तर महिलांचा विश्वचषक फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवण्यात येणार आहे.