पुणे – भारतात प्रथमच 25 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे पुण्यात रविवार ते पुढील रविवार (7 ते 14 मार्च) या कालावधीत आयोजन करण्यात आले असून लॉकडाऊननंतर अशा प्रकारची आयटीएफ स्पर्धा आयोजित करणारे पुणे हे आशियातील पहिलेच शहर ठरणार आहे.
पुण्यात पार पडणाऱ्या दोन आयटीएफ स्पर्धांपैकी यांतील एक ही पहिली स्पर्धा असून या स्पर्धेला केपीआयटी टेक्नॉलॉजी यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच, या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पीएमडीटीए यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये 10 भारतीय महिला खेळाडू व पात्रता फेरीत 35 भारतीय महिला अशा एकूण 45 भारतीय महिला खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेतील सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळविले जाणार असून राष्ट्रीय, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या नियमांनुसार व आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी केवळ अधिस्वीकृती धारकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. पात्रता फेरीचे सामने 7 व 8 मार्च होणार असून मुख्य फेरीच्या सामन्यांना 9 मार्चपासून प्रारंभ होणार आहे.
दुहेरीचा अंतिम सामना 13 मार्च रोजी व एकेरी गटाचा अंतिम सामना 14 मार्च रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे.