बारामती – बारामती शहरात कोयते दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगच्या संशयीतांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न तसेच दहशत निर्माण करणे यासह विविध गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल माने, शामवेल जाधव (रा. वसंत नगर बारामती) प्रथमेश मोरे (रा. प्रगती नगर बारामती) यश मोहिते,चै तन्य कांबळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल (दि. १७) रोजी सायंकाळच्या सुमारास कोयता गॅंगने बारामती शहरात दहशत माजवली. शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात दोन नागरिक जखमी झाले आहेत.
यावेळी या गँगने हॉटेलची तोडफोड केली. चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या. पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकल्यावर पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय समोरील दुकान व हॉटेलमध्ये घुसून भांडणे करीत मोडतोड केली. तसेच, बारामती एमआयडीसी परिसरात देखीलया गँगने धुमाकूळ घातला. या घटनेमुळे बारामती शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सामान्य नागरिकांमध्ये देखील दहशद पसरली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन ज्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना कडक शासन करावे अशा सूचना केल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे. सध्या बारामती शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नागरिक देखील आपल्या घराच्या बाहेर पडण्यास घाबरत आहेत.