– विजय लाड
कोयनानगर(प्रतिनिधी)- अल्पावधीत पर्यटन पंढरी बनलेल्या कोयना पर्यटनाला अनेक समस्यांनी ग्रासल्यामुळे पर्यटन क्षेत्रात कोयना पर्यटन क्षेत्र पिछाडीवर आहे. दरवर्षी कोयना पर्यटनाच्या विकासासाठी कोटय़वधी रूपयांचा निधी देऊनही पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या नेहरु उद्यानाचा लुक बदलण्यासाठी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा आदी प्राण्यांच्या प्रतिकृती (पुतळे) बसविण्यात आले आहेत. कोयना पर्यटनाच्या विकासासाठी पडून असलेल्या पर्यटन विकास निधीला दै. प्रभातने दिलेल्या दणक्यामुळे अखेर चार वर्षानंतर पाय फुटले आहेत.
निसर्गाने मुक्त उधळण केलेले व अल्पावधीतच थंड हवेचे ठिकाणं, विकेंड डेस्टिनेशन बनलेल्या कोयना परिसराने जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून आहे. कोयना परिसराचा पर्यावरणपूरक विकास कऱण्यासाठी पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना पर्यटनाचा समावेश प्रादेशिक पर्यटन स्थळामध्ये करून शासनाकडून कोयना पर्यटन विकासासाठी भरघोस निधी मंजूर करून घेतला आहे. शासनाच्या पर्यटन विभागाकडून २०१८-१९ कोयना पर्यटन आराखड्याला २ कोटी ५ लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
“पर्यटन विकासासाठी २०२०-२१ मध्ये जे ५० लाख खर्च करण्यात आले. त्यातील हे काम आहे. १ कोटी ३४ लाख रूपयांच्या शिल्लक असलेल्या निधीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार केले असून लवकर काम सुरू करून कोयना परिसर सुंदर बनविणार आहे.
– नितीश पोतदार (कोयना प्रकल्प कार्यकारी अभियंता).
नेहरु उद्यानाच्या निर्मीतीपासून ते आजपर्यंत उद्यानातील बालगोपाळांचे आकर्षण असलेली खेळणी मोडली व गंजली आहेत. अनेक ठिकाणी गवत वाढले आहे. पर्यटकांचे आकर्षण असणारे नेहरू उद्यान बकाल झाले आहे. कोयना पर्यटन आराखड्यातील २१ लाख रुपयांचा निधी सन २०१८-१९ मध्ये, तर ५० लाख रूपयांचा निधी २०२०-२१ मध्ये वापरण्यात आला असून यातील १ कोटी ३४ लाख रूपयांचा निधी ४ वर्षापासून पडून आहे.
दै. प्रभातने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘कोयना पर्यटनाला समस्यांचे ग्रहण’ हे सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कोयना प्रकल्प प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नेहरु उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांच्या स्वागताला वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, सांबर आदी. वन्यप्राण्यांचे मोठे पुतळे ठेवले आहेत.