कोयनानगर (वार्ताहर) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या नऊ दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कमी व्हायला तयार नाही. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर पावसाने हाहाकार उडवला आहॆ. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ५५ हजार क्युसेक झाली आहॆ. यातच मुसळधार पाऊस व कोयना जलविद्युत प्रकल्पाचे वीजनिर्मितीनंतर सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे चिपळूण तालुक्यात पूर येत असल्याने प्रशासनाने कोयनेचे पश्चिमेकडील वीज प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात पाच टीएमसीने वाढ झाली आहे.
धरणात ७१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सकाळी संपलेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १६२ तर नवजा व महाबळेश्वर येथे १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहॆ. बुधवारी दिवसभर आणि कंसात एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयनानगर ६७ (२९६१), नवजा १०६ (३४९१), महाबळेश्वर येथे ९१(२८९२). धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ५५,५५२ क्युसेक आहे.
धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू असून त्यासाठी धरणातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पायथा वीजगृहाचे दुसरे युनिट अद्याप चालु करण्यात आले नाही. धरणाची जलपातळी २१३१.०० फूट असून धरणात ७०.९६ टीएमसी पाणीसाठा आहे.