धरणातून एक लाख 33 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
पाटण – पाटण तालुक्यात कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा 16 फुटांनी उचलण्यात आले असून कोयना धरणातून 1 लाख 33 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाटण शहरातील पुराची स्थिती वाढली असून पुराच्या पाण्याने पाटणला वेढा दिला आहे.
मंगळवारी सकाळपासून धुवॉंधार पडणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळी काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा दुपारपासून तुफानी बरसणाऱ्या पावसाने पाटण शहराला वेढा दिला आहे. पुराचे पाणी
केरा पुलाला टेकले असून जुना स्टॅंड परिसरात पुराचे पाणी घुसले आहे. नवीन स्टॅंड परिसरात पाणी चाफोली रोड यादव हॉस्पिटलपर्यंत आले आहे. कोयना नदीला आलेल्या महापुराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कळके चाळपासून पाटणच्या रामापूर भागात पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद पाटण शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी पुरात असल्याने पाटण शहराचा पाणीपुरवठा चार दिवसापासून बंद आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पाटणमधील नागरिकांना पावसाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.