भोर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भोर प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. करोना बाधित रुग्णांना भोर मध्येच उपचार मिळावेत यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांचे सर्व सुविधांसह कोविड केअर सेंटर तयार करण्यात यावे, अशा सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या होत्या. त्यानुसार भोर रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केले आहे, असे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
भोर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अजित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे उपस्थित होते.
तालुक्यातील बाधित रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधांनी युक्त 50 खाटांचे कोविड केअर सेंटर तयार केले आहे. भोर येथील राजगड ज्ञानपीठाच्या मुलींच्या वसतिगृहात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्या संपर्कातील 100 लोकांचे स्वॅब तपासले जातील, अशी व्यवस्था तेथे केली आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथेही 50 खाटांचे नियोजन केले आहे. उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय बामणे तर आयटीआय येथील रुग्णांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले जात आहेत. रुग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग प्राथमिक शिक्षक भवन येथे सुरू केला आहे.
त्यासाठी शासकीय व खासगी डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले आहे. त्यांना लागणारी औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे, आंबवडे येथून पुरवली जात आहेत. आंबवडे व नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वीप्रमाणेच रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत, असेही प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
प्रसूती शस्त्रक्रिया होणार अल्पदरात
भोर उपजिल्हा रुग्णालय हे कोविड केअर सेंटर यासाठी असले तरी त्या ठिकाणी होणाऱ्या प्रसूती शस्त्रक्रिया (सिझर) या भोर येथील खासगी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित शेठ, डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. इम्रान खान यांच्या दवाखान्यात अल्पदरात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.