फेयेटविल (अमेरिका) – अध्यक्ष म्हणून निवडून आल्यास पहिल्याच दिवशी आपण कोविड-19 शी संबंधित कृती आराखडा तयार करू, असे आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी दिले आहे.
फिलाडेल्फियातील आपल्या प्रचारसभेमध्ये बोलताना बिडेन यांनी करोनाची साथ हाताळण्यावरून अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनावर जोरदार टीका केली. करोनाची भीषण समस्या असताना मास्क घालण्याच्या कृतीची थट्टा करण्यापेक्षा स्वतः मास्क घालणारा अध्यक्ष असता तर देशातील स्थिती काय झाली असती? एक गोष्ट मात्र नक्की आहे.
अमेरिकेत करोनाच्या साथीमध्ये आतापर्यंत 2 लाख 30 हजार जणांचा मृत्यू नसता आणि 92 लाख जणांना कोविड-19 चा संसर्गही झाला नसता, असे बिडेन म्हणाले.
आता अध्यक्ष ट्रम्प यांनी आपला गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. ट्रम्प यांच्या काळात गोंधळ, ट्विट, राग, द्वेष, अपयश आणि बेजबाबदारपणा खूप झाला. आता आपल्याला खूप काम करायला लागणार आहे. करोना विषाणूला पराभूत करण्यासाठी सर्वप्रथम ट्रम्प यांचा पराभव करावा लागणार आहे, असे आवाहन बिडेन यांनी केले.
करोनाबाबत इतके महिने ज्या ऍक्शन प्लॅनबद्दल बोलत आहे. तो अध्यक्षपदाच्या पहिल्याच दिवशी अमलात आणला जाईल. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, टेस्टिंग, ट्रेसिंगबरोबर मोफत उपचारांसह जेंव्हा उपलब्ध होईल तेंव्हा लस देखील मोफत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन बिडेन यांनी दिले.
अमेरिकेत सध्या सरासरी 1 लाख रुग्ण दररोज सापडत आहेत. हे विक्रमी आकडे यापुढे दिसणार नाहीत, अशी हमी देखील बिडेन यांनी दिली.