बेकायदेशीर नेमणुकीमुळे कोतवाल संतापले

हवेली तालुका महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेत खदखद

थेऊर – हवेली तालुक्‍यात बहुतांशी गावकामगार तलाठी व मंडलाधिकारी यांनी महसूल दफ्तरी आपली कामे पार पाडण्यासाठी खासगी लोकांची अवैधपणे नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून शासकीय दस्ताऐवजातील कागदपत्रे गहाळ अथवा त्यात फेरफार करून गायब होण्याची भीती हवेली तालुका महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेने व्यक्‍त केली आहे. त्यामुळे शासकीय कोतवाल व खासगी लोकांमध्ये तलाठी कार्यालयातील कामांवरून ठिणगी पडली आहे.

शासकीय कोतवालांनी तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयातील खासगी लोकांना हटवण्याची मागणी तालुका तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. काही तलाठी व मंडलाधिकारी यांना संगणकीय ज्ञान नसल्याने व शासनाकडून कोणतेही त्याबाबत प्रशिक्षण दिले गेले नसल्याने त्यांनी याकामी आपल्या कार्यालयात संगणकीय व इतर कामासाठी खासगी लोकांची नियुक्‍ती केली आहे. त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यातच तलाठी सजामध्ये कार्यरत असलेले शासकीय कोतवाल व खासगी लोकांमध्ये कामाच्या विभागणीवरून दुरावा निर्माण झाला आहे.

शासकीय दफ्तराचा खासगी लोकांकडून दुरूपयोग होऊ शकतो. त्यांच्याकडून दफ्तर व्यवस्थित हाताळले जात नाहीत. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. असे कोतवालांनी निवेदनात नमूद केले आहे. हवेली तालुक्‍यातील तहसीलच्या कार्यक्षेत्रातील महसूल विभागात एकूण 55 कोतवाल कार्यरत आहेत. तालुक्‍यात गौणखनिज वसुलीचे काम असो अथवा महसूल विभागातील स्थळ पाहणी, वरिष्ठ कार्यालयातील नोटीसा बजावणे, अपत्कालीन परिस्थिती, पंचनामा, संगणकीकृत सातबारा यामध्ये कोतवाल सातत्याने तलाठ्यांना मदत करत असतात.

खासगी नेमणूक केलेल्या लोकांना हटविण्याची मागणी

अगदी मंत्र्यांपासून वरिष्ठ अधिकारी यांच्या राजशिष्टाचाराची (प्रोटोकॉलची) जबाबदारीही कोतवाल प्रामाणिकपणे पार पाडत असतात. मात्र, पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 437 कोतवालांना तलाठी सजामध्ये कार्यरत असलेल्या खासगी लोकांमुळे असुरक्षित वाटू लागली आहे. आमच्या हक्‍कांवर गदा येत असल्याची भावना कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

तलाठी व मंडलाधिकारी सजामधील खासगी लोकांना त्वरित हटवण्याची मागणी महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेनी केली आहे. याकडे दुर्लक्ष झालेस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती कोतवाल संघटनेने दिली आहे.

तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडून शासकीय दफ्तरी कामात खासगी लोकांची वावर बेकायदेशीर आहे. याबाबत माहिती घेत असून याबाबत संबंधित तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात येईल.
– सुनील कोळी, तहसीलदार, हवेली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)