मनसेचे उमेदवार ऍड. किशोर शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे – कोथरूडमधील मतदार सजग आणि जागरूक असून ते आयात उमेदवाराला साथ न देता घरच्या उमेदवाराला निश्चित साथ देतील, असा विश्वास कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार ऍड. किशोर शिंदे यांनी व्यक्त केला.
गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघात नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. परिणामी, नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून त्या सोडवण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे ऍड. शिंदे म्हणाले. त्यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी शास्त्रीनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. स्वप्नील दुधाने, बापू डाकले, गणेश माथवड, संतोष ढोक, संजय खोपडे, उमेश कंधारे, विजय खळदकर, विशाल भेलके, संदीप मोकाटे, दिनेश सुतार, रोहिदास सुतार, दामोदर कुंबरे, मिलिंद बालवडकर आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, या मतदारसंघात नगरसेवक असताना अनेक विकासकामे मार्गी लावली. सध्या मतदारसंघाचा विकास रखडला असून नागरिकांना वाहतूक कोंडी, पाणी, आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत बोलण्यास कोणीही तयार नाही. मागील अपयश झाकण्यासाठी विरोधकांवर उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे.